क्षणिक आनंदापेक्षा निरंतर समाधान मिळवावे

आपल्या गत आयुष्यात रममाण व्हायला आपल्याला प्रत्येकालाच हवे असते, ते अधिक प्रियही असते. आपल्या प्रत्येकाच्याच साठवणीतल्या अनेक आठवणी असतात. हर्षाच्या-स्पर्शाच्या, घरच्या-दारच्या, प्रीतीच्या-मैत्रीच्या, स्पर्धेच्या-बक्षिसांच्या, शाळेच्या-कॉलेजच्या, बालपणीच्या-तारुण्याच्या; अशा एक नाही तर अनेकविध आठवणीत आपल्या अंतर्मनाला सुखावण्यासाठी अनेकदा त्या आपण स्मरत असतो. ह्यांत काही आठवणी सुखाच्या-दु:खाच्या, रागाच्या-वादाच्या, विरहाच्या-प्रहाराच्या, प्रयासाच्या-त्रासाच्या, मानाच्या-अपमानाच्या अशा मिश्र स्वरूपाच्याही असतात. अनेकदा काही घटना आपण कितीही आठवायच्या ठरवल्या तरीही नीट, पूर्णपणे आठवता येतातच असे नाही; तर काही घटना मात्र अनावधानाने, आपोआप आपल्या डोळ्यासमोर पुनःश्च यायला लागतात. खरेच, ह्या मनाचे नेमके काय रसायन आहे, आपल्याला काही कळत नाही.

आपल्या स्वप्नातल्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण अनुभवताना, त्यासाठी जीवनशैली निवडताना आपल्या आशा, अपेक्षा, इच्छा. ईर्षा, उन्नती, संपन्नता यांच्या परिपूर्णतेसाठी प्रत्येक बाबींचा विचार करणे आवश्यक असते. आपली, आपल्या कुटुंबाची खरी ओळख आपापल्या व्यक्तिमत्वावरूनच होत असते. आपली सजगता, सतर्कता आणि सौंदर्यदृष्टी यांचा मिलाफ आपण आपल्या जीवनात घडवून आणू शकतो. मनात घर करून राहिलेल्या आपल्या प्रतिमेला आपल्या मनाइतकेच सुंदर सजवायचे, खुलवायचे असते. प्रतिमा छोटी असली तरीही चालेल पण त्याला सजवणारे मन मात्र मोठे असावे लागते. आपल्या छोट्या प्रतीमेतूनच मोठ्या मनाने सौंदर्याचा साक्षात्कार घडवायचा असतो, त्यातच जीवनातले सार सामावलेले असते.

आपल्यापैकी प्रत्येकांत काही उणिवा असतातच, उणिवा नसणारी व्यक्ती सापडणे सद्य:स्थितीत विरळाच; त्याचा शोधही न घेतलेला बरा. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यांत काहींमध्ये संकृतीचे तर काहींमध्ये काही विकृतीचे दर्शन आपल्याला घडत असते. अर्थातच कोणत्याही विकृतीची स्वीकृती आपण सहसा करत नाही, पण आपल्या संकृतीला आणि आपापल्या प्रकृतीला साजेशी एखादी कलाकृती ठरेल अशी कृती करण्याची आपल्याला जाणीव काहीवेळा का होत नाही? कालच्या काही उणिवा कुरवाळत बसण्यात आपण धन्यता मानतो, सतत उणिवांचीच, समस्यांचीच, द:खाचीच सर्वत्र आणि सातत्याने चर्चा करत राहतो. आजच्या आपल्या आणि इतरांच्या जाणीवा जपण्याच्या दृष्टीकोनातून आपण खरंच गांभीर्यानं विचार करतोच असे नाही.  

आपल्या बुद्धिवादी जीवाला कालच्या उणिवा दूर करून, आजच्या जाणीवा जपून त्यांना नेणीवेपर्यंत नेण्याची आज खरी गरज आहे. ह्यासाठी आपल्या प्रत्येकाचेच विचार, वर्तन आणि व्यवहार हे स्वतः पुरते मर्यादित न ठेवता इतरांच्या उणिवा दूर करून, त्यांच्या जाणीवा जपून त्यांना नेणीवेपर्यंत नेण्याच्या कामी यायला हवेत.

प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा संबंध त्या व्यक्तीच्या मानसिकतेशी निगडीत असतो. आपापली अपेक्षा, गरज, उपजत कलागुण, छंद, आवड, निवड, सवड, वैचारिक क्षमता, सामजिक स्थान, व्यावसायिक संबंध, कौटुंबिक आकार, शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत तसेच याव्यतिरिक्त इतर सर्व लौकिक आणि अलौकिक गुण ह्या सर्व बाबींवर आपले अंतर्बाह्य व्यक्तिमत्व कसे असू शकेल, हे ठरते. आपल्या राहणीमानात एकप्रकारे आपले व्यक्तिमत्व ऐट अणू शकते. कल्पक आणि सौंदर्यपूर्ण सकारात्मक विचार, आचार आणि व्यवहार करणारे मन निश्चितच आपल्या जीवनात सौदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकते.

आपण करत असलेले दैनंदिन काम, आपापसातील प्रेमसंबंध, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, वैयक्तिक विकास, आरोग्य आणि निरोगीपणा तसेच इतरांसह अनेक माध्यमांमधून जीवन समाधानासाठी योगदान देणारे अनेक घटक आहेत, ज्याचा आपण सखोल विचार करणे गरजेचे असते. जीवनातील समाधान हे दिसते त्यापेक्षा थोडे अधिक अस्पष्ट असते. काहीवेळा समाधान हा विचार, विषय आणि त्यांचा अनुभव आनंदासोबत अदलाबदल करण्यायोग्य वापरला जातो, परंतु त्या दोन अत्यंत वेगळ्या संकल्पना आहेत, जे आपण प्रत्येकजण प्रत्यक्ष अनुभूती घेऊनच त्याची प्रचीती घेऊ शकतो.

जीवनातील समाधान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या सध्याच्या आनंदाची पातळी नव्हे, तर संपूर्ण जीवनाचे मूल्यमापन होय. आनंद हा तात्कालिक, क्षणोक्षणी येत असणारा अनुभव असतो; येत असलेला कोणताही अनुभव आनंददायक असला तरी देखील तो शेवटी क्षणभंगुर असतो हेही समजून घेणे आवश्यक असतं. निरोगी जीवनात आनंदाचे क्षण नक्कीच समाविष्ट असतात, परंतु सामान्यतः केवळ आनंदानेच पूर्ण समाधानी जीवन मिळत नाही. जीवनातील समाधानाचे उपाय सामान्यतः व्यक्तिनिष्ठ, व्यक्तीसापेक्ष असतात किंवा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या जीवनात वैयक्तिकरित्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या अनुभवांवर आधारित असतात. आपल्याला वैयक्तिकरित्या अर्थपूर्ण वाटत नसलेल्या घटकाच्या आधारे आपले जीवनातील समाधान निश्चित केले जातेच असे नाही.

काही महत्वपूर्ण सिद्धांत असे मानतात की, आपले दैनंदिन काम, नातेसंबंध, कुटुंब, मित्र, वैयक्तिक विकास आणि आरोग्य तसेच तंदुरुस्ती यासारख्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला समाधान मिळत असते. या बाबींतील आपले समाधान आपल्या एकूण जीवनातील समाधानाची निर्मिती करते. सिद्धांताची ही सोपी अनुभूती खरोखरच जीवनातील समाधान मिळवण्यात अयशस्वी होण्याचे कारण म्हणजे, ते अयोग्यरित्या अशा व्यक्तीमध्ये जीवन समाधान दर्शवू शकते कि, जी केवळ तात्पुरते किंवा उत्स्फूर्तपणे आनंदी आहेत; परंतु त्या व्यक्तीचे जीवन कसे चालले आहे, याचा विचार करण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाही, असेही अनुभवण्यात येते. उत्स्फूर्त आनंदी राहण्यात नक्कीच काही चूक नाही, परंतु जीवनात समाधान मिळवण्यासाठी क्षणभर आनंदी असण्यापेक्षा अधिक काही महत्वाचे असते हे प्रत्येकाने आपापल्यापरीने, व्यक्तिगत अनुभूतीनुसार ठरवणे आवश्यक असते.

जीवनातील समाधान हे उत्तम शारीरिक आरोग्य, उच्च कार्यक्षमता आणि मजबूत सामाजिक संबंधांशी संबंधित असते. आपण आपल्या जीवनात किती समाधानी आहोत, हे आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे असते. आपण किती आनंदी आहोत यापेक्षा आपण किती समाधानी आहोत, हे महत्वाचे असते. आपल्या जीवनाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी हा अधिक अर्थपूर्ण दृष्टीकोन असल्याचे आपण अभ्यासपूर्वक समजून घेतले पाहिजे.

आपल्या मनात चालू असलेल्या असंख्य विचारांच्या एका लहानशा भागाची आपल्याला काहीवेळा जाणीव नसते त्यामुळे आपल्या विचारांच्या फक्त एका छोट्या भागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपले बहुसंख्य विचारप्रयत्न हे अवचेतनपणे चालू असतात. एक किंवा दोन विचारांमुळे एखाद्यावेळी चेतना भंग होण्याची शक्यता असते. नकारात्मक विचारांचा विपरीत परिणाम होत असतो, तर सकारात्मक विचार यशप्राप्तीसाठी उपयुक्त ठरतात. आपल्या प्रत्येक कृतीपूर्वी विचार होण्याची जरुरी असते. आनंदप्राप्तीसाठी सकारात्मक विचारांचा माध्यम म्हणून उपयोग करण्याची आपल्याला सतत जाणीव होणे आवश्यक असते. आपल्या मनांत येत असलेल्या प्रत्येक विचाराचा परिणाम कमी अधिक प्रमाणांत आपल्या मानसिकतेवर होत असतो.  

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत