गृहप्रवेश

गृहसजावट करताना आपल्याला सर्वात प्रथम सुरुवात करावी लागते ती त्या घराच्या प्रवेश द्वारापासून.

घरात प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्वाचं स्थान म्हणजे त्या घराचं प्रवेश द्वार. आपल्या गृह प्रवेशाच्या वेळी तसेच आपल्याकडे येणार्‍यांचे स्वागत करण्यासाठी हे प्रवेश द्वार केवळ सज्जच नाही तर सजलेलं असलं पाहिजे. आपल्या पैकी अनेकांसाठी गृहप्रवेश आपल्या घराशी असलेल्या भावनिक नात्याशी संबंधित असतो. गृहप्रवेशाच्या बाबतीत अनेकांच्या निरनिराळ्या संकल्पना असतात. स्वतःच्या घरातला पहिला प्रवेश नेहमीच अविस्मरणीय असतो. त्यांतही ते घर पहिलंच असेल तर एक निराळाच आनंद असतो.   

या मुख्य प्रवेश द्वारामुळे आणि त्याच्या संरचनात्मक सजावटीमुळे त्या घरात राहणाऱ्यांची संस्कृती, सौंदर्यदृष्टी, सजकता, सुरक्षितता, सामाजिक स्थान, आर्थिक कुवत, शैक्षणिक पात्रता अशा अनेक बाबींची कल्पना येत असते. आपल्या घराची सुरुवातच मुळी या ठिकाणापासून होत असते. आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाच्या प्रथम भेटीतच आपल्याकडे आणि आपल्या घराकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा असेल हे सर्वस्वी आपल्या घराच्या मुख्य प्रवेश द्वारावर अवलंबून असतं. या कारणामुळे एकूणच आपल्या घर सजवण्याच्या सर्व कामांमध्ये अत्यंतिक महत्वाचं काम म्हणजे मुख्य प्रवेश द्वाराची संरचनेच्या माध्यमातून सजावट करणं.

  • गृहसजावटीत प्रथम स्थान प्रवेशद्वाराचं :

आपल्या दैनंदिन जीवनात आपण प्रामुख्याने प्रवेश द्वाराचा वापर दिवसभरात अनेकवेळा आणि निरनिराळ्या कारणाने करत असतो. घराचा मुख्य दरवाजा त्या घरात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला वापरावाच लागतो. त्यामुळेच गृह सजावट करताना प्रवेश द्वाराचं स्थान मोलाचं आणि म्हणूनच मानाचं असतं. प्रवेश द्वार खरं तर त्या घराची एक प्रकारे ओळखच असते. शास्त्रीय दृष्टीकोनातून प्रवेशद्वाराची सजावट करण्याचं नेमकं महत्व काय याचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं आहे. अपार्टमेंटमध्ये असलेल्या घराचं मुख्य प्रवेश द्वार सर्वसाधारणपणे एकेरीच असतं. अशा दाराच्या बाहेरील बाजूस सुरक्षिततेसाठी अजून एका सेफ्टीडोअरची सोय केली जाते.

  • प्रवेश द्वाराची जागा आणि ठिकाण :

 आपल्या घराचं प्रवेश द्वार कशा प्रकारे सजवावं हे सर्वसाधारणपणे आपल्या घराची जागा, ठिकाण, मुख्य प्रवेश द्वाराची जागा, त्या सभोवतालची जागा, घराची उंची, एकूणच आकारमान, घराची जमिनीपासूनची उंची, घराच्या बांधकामाचे स्वरूप, आजूबाजूचा परिसर अशा अनेक बाबींचा अभ्यासपूर्वक विचार होणं गरजेचं असतं. या शिवाय आपल्या स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबियांच्या लौकिक आणि अलौकिक गुणांचा देखील विचार होणं आवश्यक असतं. आपला व्यवसाय तसेच शिक्षण हे देखील आपल्या घराच्या प्रवेश द्वाराच्या संरचनेवरून नव्यानं आपल्या घरी येणाऱ्यांना समजू शकलं पाहिजे.

  • स्थापत्य शास्त्र आणि अंतर्गत सजावट यांचं महत्व :

आजही वाडा संस्कृतीच्या माध्यमातून साकारलेल्या घरांची प्रवेश दारं निरनिराळ्या प्रकारे सजवलेली पाहायला मिळतात. या घरांच्या मुख्य दाराची सजावट करताना प्रामुख्याने सभोवतालच्या भिंतींवरही चित्रकृतींच्या उपयोगातून विविध प्रकारे त्या घराचं आणि दाराचं महत्व पटवून देण्याचाच एक प्रकारे प्रयत्न केलेला असल्याचं दिसून येतं. अशा घराच्या दाराबाहेरील ओसरी देखील विशिष्ट प्रकारे सजवली जात असल्याचं दिसतं. घराचा उंबरठा, दाराची चौकट आणि मुख्य दार या सर्वच भागांचा सजावट करताना विचार केला जात असल्याचं आपल्या लक्षात येतं. आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठी असं सजवलेलं दार सज्ज असल्याची संकल्पना त्यामागे असल्याचं समजलं जातं. या दारांची सजावट प्रामुख्यानं लाकडाचा वापर करून आणि त्यावर कोरीवकाम, नक्षीकाम करून केली जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही सजावट करत असताना काहीवेळा पितळी वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केल्याचंही दिसून येतं. वाडा संकृतीच्या घरांना किमान मुख्य दोन दारं असतातच परंतु तरीही कायम मुख्य प्रवेश द्वाराच्या सजावटीलाच अधिक प्राधान्य दिलं जात असल्याचही आपल्या लक्षात येतं. 

  • प्रवेश द्वार म्हणजे त्या घराचा आरसा :

हल्लीच्या घरांमध्ये आपल्याला नाविन्यपूर्ण प्रवेश द्वारांचा मुळातच वापर केल्याचं दिसतं. फरक एवढाच कि त्यांचं संरचनेचे स्वरूप बदललं आहे, त्यांच्या सजावटीच्या संकल्पना बदलल्या आहेत, आणि अर्थातच त्यांचे आकार तसेच आकारमान देखील निराळे झाले आहे, त्यांच्या जागा वेगवेगळ्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. अपार्टमेंटमधल्या घरात आणि बंगल्यात एकूणच त्यांच्या संरचनेत खूप फरक असतो.

  • प्रवेश द्वाराची संरचना आणि त्या घरातलं कुटुंब :

आपलं घराचं स्वप्न साकार होताना आपल्याला मिळणारा आनंद निश्चितच निराळा असतो. स्वप्नात बघितलेल्या घराची सुरुवातच मुळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेश द्वारापासून होते. आपल्या घराची खरं तर ओळख होत असते ती मुख्य प्रवेश द्वारामुळे. आपल्या व्यक्तिमत्वातील सर्व गुणांचा परिचयच या प्रवेश द्वारामुळे होत असतो.

  • विविध मोज-मापं लक्षात घेऊन प्रवेश द्वाराची संरचना :

बंगल्याच्या मुख्य प्रवेश द्वारासाठी सजावट करण्याच्या दृष्टिकोनातून बरंच काही करण्यासारखं असतं. मुख्य म्हणजे त्याचं आकार आणि आकारमान दोन्हीही अपार्टमेंटमधल्या घराच्या तुलनेनं मोठं असतं. त्यामुळे अशा ठिकाणी दोन दारांचे प्रवेश द्वार बनवता येऊ शकतं. अथवा गरजेनुसार दाराचा आकार ठेवून उर्वरित भागात काचेचे पार्टिशन बनवून घेता येऊ शकतं. या काचेच्या पार्टिशन ऐवजी आपण ग्लास ब्रिक्स देखील वापरू शकतो. त्यामुळे एकतर नैसर्गिक प्रकाश तर उपलब्ध होतोच शिवाय घराच्या आतून घराच्या प्रवेश द्वाराबाहेरील सर्वकाही व्यवस्थितपणे आपल्याला दिसू शकतं. आपल्याकडे येणारी व्यक्ती कोण आहे हे नीटपणे आपल्याला समजू शकतं. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जे नेहमीच आवश्यक असतं.  

  • विविध प्रकारचा माल वापरुन बनवलेलं प्रवेश द्वार :

मुख्य प्रवेश द्वार मग ते कोणत्याही घराचं असो, ते बनवण्यासाठी प्रामुख्यानं लाकडाचा उपयोग अधिक केला जातो. त्यासोबत मेटल, काच, स्टील, जी. आय., राॅट आयर्न अशा अनेक वस्तूंचा वापर केला जाऊ शकतो. प्रत्येक प्रवेश द्वारासाठी एक चौकट बनवून घ्यावीच लागते. या चौकटीच्या आकारावरून आणि ती बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तूंवरून त्या दरवाजाची मजबुती ठरत असते. हल्ली लाकडाचा वापर चौकट बनवण्यासाठी कमी करून त्या ऐवजी लोखंडाची चौकट बनवण्याची पद्धत प्रचलित झाल्याचं दिसून येतं. चौकट कोणत्याही वस्तूपासून बनवली गेली तरीही ती नेहमीच भिंतीमध्ये काही प्रमाणात गुतवली जाते. त्यामुळे चौकटीला आणि दरवाजालाही मजबुती येऊ शकते.

गृह प्रवेश आपल्या स्वतःला आणि आपल्याकडे येणार्‍या प्रत्येकाला आकर्षित करणारा तसेच अविस्मरणीय ठरला पाहिजे. तेव्हाच आपल्या घराचं नेतृत्व करणारं प्रवेश द्वार आपल्या कौटुंबिक सदस्यांचं कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी समर्थ ठरु शकतं.  

— विद्यावाचस्पती विद्यानंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत