गृहसजावट – सौंदर्याचा साक्षात्कार
अंतर्गत संरचना आणि सजावट करताना उपयुक्तता आणि सौदर्य या दोन बाबींना अधिक महत्व असतं. या दोन्हींचा मिलाफ झाल्यामुळेच आपल्या घराचं अंतर्गत संरचना आणि सजावटीचं काम पूर्णत्वास जाऊ शकतं. आपल्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी उपयुक्तता आणि मानसिक आनंद देण्यासाठी सौदर्य महत्वाचं असतं. सौंदर्याचा आत्मिक आनंद मिळवण्यासाठी आपल्याला कल्पकतेच्या माध्यमातून आणि सौंदर्यदृष्टीच्या सहाय्यानं अंतर्गत संरचना साकारण्याची जरूरी असते. यावेळी आपल्याला गरज असते आपल्या सजगतेची, वैचारिक प्रगल्भतेची, नाविन्याची, सौदर्यदृष्टीची, कल्पकतेची, नवलाईची. या सर्व बाबींच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित आनंद मिळवणं शक्य होऊ शकतं. गृहसजावटीतील सौंदर्य म्हणजे नेमके काय ? ते कशासाठी आणि कसं मिळवायचं ? त्यासाठी काय करावं लागतं ? अशा अनेकविध प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी खरी जरूरी असते निरीक्षण, परीक्षण आणि समीक्षणाची. सौंदर्याचा शोध कधी संपतच नसतो.
गृहसजावट काळाची गरज
शास्त्रीय दृष्टीकोनातून गृह सजावट करण्याचं नेमकं महत्व काय ? याचा अभ्यासपूर्वक विचार करणे जरुरीचे आहे. दिवसेंदिवस कमी होत चाललेलं घराचं आकारमान, वाढत असलेल्या आपल्या गरजा, उपयुक्तता, बदलत चाललेलं जीवनमान तसेच राहणीमान आणि सौंदर्याची संकल्पना यासर्व बाबींमुळे गृहसजावट ही काळाची गरज होत चालली आहे.
- गृहसजावटीमधील सौदर्याचं स्थान आणि महत्व:
गृहसजावट करताना उपयुक्तता ही जितकी महत्वाची असते तितकेच सौंदर्याला देखील महत्व असतं. आपण आपल्या घराच्या अंतर्गत सजावटीत सौंदर्याचा शोध घेत असतो तेव्हा ते अधिकाधिक कसं मिळवता येईल यासाठीच प्रयत्नशील असतो. सुंदरता ही खरं तर आपल्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. प्रत्येक गोष्ट ही सुंदरच असते अशा सकारात्मक दृष्टीने आपण बघितलं की अशावेळी त्या गोष्टी मध्ये सौंदर्याचा साक्षात्कार व्हायला लागतो. गृहसजावटीमधील सौंदर्याचं स्थान आणि महत्व हे तेव्हाच आपण अनुभवू शकतो. आपण अनुभवत असलेल्या धकाधकीच्या जीवनात आपल्या घरात प्रवेश करता क्षणी आपल्याला जरूरी असते ती म्हणजे आपल्या अंतर्मनाला आश्वस्त करेल अशा वातावरणाची. केवळ याच कारणामुळे गृहसजावटीमधील सौदर्याचं स्थान आणि महत्व अधिक असतं.
- गृहसजावटीमध्ये सौदर्य मिळवण्याची साधनं:
गृहसजावटीमध्ये सौंदर्य साध्य करणं हे जसं महत्वाचं असतं, तसंच ते मिळवण्याची साधनं माहिती करून घेणं देखील तितकंच आवश्यक असतं. या साधनांमध्ये गृहसजावट करण्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक वस्तूची निवड महत्वाची असते. नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्हींचा मेळ बसवून प्रत्येक काम करणं जरूरीचं असतं. प्रत्येक वस्तूचा पोत, रंग, प्रकार, त्यांचा इतर वस्तूंशी येणारा संबंध, त्या वस्तूचं नावीन्य या सर्वच बाबींचा विचार करावा लागतो. या वस्तूंच्या निवडीत प्रकाश योजनेचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष होणारा दृश्य स्वरुपातील परिणाम समजून घ्यावा लागतो.
- मानसशास्त्रीय दृष्टीकोंनातून गृहसजावटीमधील सौदर्य:
मुळातच गृहसजावट ही केवळ कला नसून ते शास्त्रही आहे. त्यांतही या कामात मानसशास्त्र हे अधिक महत्वाचं असतं.आपण घरात राहतो ते आपल्या शरीराला एक सुरक्षित आसरा हवा म्हणून पण त्याहीपेक्षा मनाला, मनाप्रमाणे, मनपसंद, मनातल्या घरात मनमुरादपणे राहता यावं हे त्यामागचं खरं कारण असतं. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या स्वतःच्या घराचं स्थान अधिक मोलाचं असतं. कारण त्याचा थेट संबंध आपल्या मानसिकतेशी असतो. तो देखील अशा मनाशी की जे सतत सौंदर्याचा शोध घेत असतं.
- सौदर्याची प्रचिती म्हणजेच प्रेमाची अनुभूति:
सौंदर्याची प्रचिती म्हणजेच प्रेमाची अनुभूति. आपण आपल्या घरावर, कुटुंबियांवर, आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूवर, प्रेम करत असतो. या प्रेमाची सुरुवात सौंदर्यापासून होत असल्याचं आपण अनेकदा अनुभवतो. एखादी वस्तू आपल्याला जेव्हा आवडते म्हणजेच मनात भरते तेव्हा ती अधिकच सुंदर असल्याचं आपल्याला वाटायला लागतं. अर्थात अशावेळी आपला त्या वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील निराळा असतो. म्हणूनच ती वस्तू आपल्या मनात घर करून राहते.
- वैचारिक प्रगल्भतेतून सौदर्याची निर्मिती:
सौंदर्याचा संबंध मानसिकतेशी आणि मनाचा संबंध विचारांशी असतो. या कारणास्तव गृहसजावट करताना वैचारिक प्रगल्भतेतून सौंदर्याची निर्मिती करणं आवश्यक असतं. सकारात्मक विचार हे निश्चितच प्रगल्भ असतात. आपल्या गृह सजावटीच्या कामात निवडलेल्या प्रत्येक संरचनेत आपला सकारात्मक दृष्टिकोन असल्याचा प्रत्यय आला पाहिजे. सकारात्मक विचार प्रगतिच्या दिशेने मार्गस्थ होणारे असतात. त्यासाठी गृह सजावट करताना आपण निवडत असलेल्या प्रत्येक वस्तु, त्यांचे रंग, रूप, आकार, आकारमान, स्वरूप, ती वस्तू बनवण्यासाठी वापरलेला माल, त्या वस्तूची संरचना, उपयुक्तता, त्या वस्तूचं सौंदर्य अशा अनेक बाबींमधून आपला सकारात्मक दृष्टिकोन दृष्टीस पडला पाहिजे.
अशा सौंदर्य विकसित करणार्या अनेकविध बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोंनातून अभ्यासपूर्वक विचार करून, गृहसजावट कशी करावी हे जाणून घेऊन आपल्या घराला घरपण देणं आणि सौंदर्याच्या साक्षात्कारासाठी गृहसजावट करणं सहज शक्य होऊ शकतं.
— विद्यावाचस्पती विद्यानंद