गृह सुरक्षितता आणि सजावट

घराला घरपण देणारी आधुनिक सजावट करून नुसतं भागत नाही तर त्या घराची आणि त्या घरात राहणार्‍या प्रत्येकाची सुरक्षितता विचारात घेण्याच्या दृष्टीकोनातून काही नावीन्यपूर्ण उपाय योजना केलेल्या असणं आवश्यक असतं. सद्य:स्थितीत घराच्या बाबतीत सर्व प्रथम सुरक्षितता महत्वाची असल्याचं आपण विसरून चालणार नाही. त्यासाठी कराव्या लागणार्‍या उपाय योजना, सोई सुविधा घराच्या मुख्य दरवाजापासून घरातील अत्यंत जोखमीच्या आणि मौल्यवान जिनसा ठेवण्याच्या जागेपर्यंत अभ्यासपूर्वक विचारात घ्यायला हव्यात. घराचं सौंदर्य आणि अंतर्बाह्य सजावट हे जसं महत्वाचं असतं तसंच संपूर्ण घराची, घरातील मालमत्तेची आणि घरातील कुटुंबियांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक असतं.    

गृह सुरक्षितता आणि सजावट :

आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपल्या कुटुंबासाठी आणि एकूणच आपल्या घरासाठी पैसे मिळवण्यासाठी धडपडत असतो. पै पै जमवलेली जमापुंजी आपण सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. मिळवलेल्या पैशाचं सुख आणि समाधान जसं आपल्याला हवं असतं तसंच त्याची सुरक्षितता देखील ठेवणं अनिवार्य असतं. आपल्या मालमत्तेचं गृह सजावट करत असताना शास्त्रीय दृष्टीकोनातून सुरक्षिततेच्या उपाय योजना करण्याचं नेमकं महत्व काय आणि त्या कोणत्या प्रकारे करता येऊ शकतात याचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं आहे. घराच्या सुरक्षाव्यवस्थेची गरज ही काही दिवस आपण घराबाहेर, अन्य ठिकाणी अथवा बाहेरगावी असल्यामुळे घर बंद राहणार असेल तर जशी असते तशीच गरज आपण घरात असताना देखील तितकीच असते.  

  • प्रवेश द्वारावरील सुरक्षा योजना : हल्ली नव्यानं बांधलेल्या अनेक इमारतींमध्ये प्रत्येक घराच्या आणि त्या घरातील कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाय योजना राबवलेल्या असतात. त्या जर पुरवल्या गेल्या नसतील तर निश्चितच आपण त्यांचा अभ्यासपूर्वक विचार करून वापर केला पाहिजे. घराच्या मुख्य दाराबाहेर अधिक सुरक्षेसाठी अजून एक दार अर्थात एम. एस. सेफ्टी डोअर अनेक ठिकाणी बसवलं जातं. परंतु त्याच बरोबर त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वयित होणं अधिक महत्वाचं असतं. सी सी टीव्ही कॅमेरा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावलेला असेल तर निश्चितच आपण घरात असलो अथवा नसलो तरीही आपल्याकडे किंवा घरापाशी कोण येऊन गेलं हे कधीही पाहता येऊ शकतं. ही अधिक सोईस्कर, प्रचलित, माफक खर्चात होणारी, अनेक फायदे देणारी आणि म्हणूनच अनेकांना पसंत पडलेली सुरक्षा योजना आहे.  हल्ली या योजनेचा वापर आपल्या मोबाइलवर देखील आपण करू शकत असल्याने कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी घरापाशी घडणार्‍या घडामोडी आपण मोबाइलवर बघू शकतो.
  • प्रवेश द्वारावरील सुरक्षा योजनेचे विविध प्रकार : प्रवेश द्वारावरील सुरक्षा योजनेचे विविध आधुनिक प्रकार सद्य:स्थितीत बाजारात उपलब्ध आहेत. डोअर कॅमेरा, सी सी टी व्ही कॅमेरा, अॅक्सेस कंट्रोल लॉक, बायोमेट्रिक लॉक, इंटरकॉम, टेलिकम्युनिकेशन सिस्टम, डिजिटल लोंक्स, नंबरिंग लोंक्स, रीमोट कंट्रोल लोंक्स, डोअर कॅमेरा विथ फोन, रेमोट अॅक्सेस कॅमेरा, कम्प्युटराईस्ड मेसेज सिस्टम, मेसेज अलर्ट सिस्टम, सिक्युरिटी सायरन, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म सिस्टम अशा विविध प्रकारांतून आपल्या घराला साजेशी आणि आपल्या आर्थिक दृष्ट्या परवडेल अशी निदान एखादी तरी सुरक्षा योजना आपण कार्यान्वयित करून घ्यावीच.   
  • अंतर्गत संरचनेतील सुरक्षा व्यवस्था : घरातून बाहेर पडल्यानंतर जर घरातील एयर कंडीशनर, ट्यूबलाइट, फॅन, अथवा एखादे किचन मधील इलेक्ट्रिकल अथवा इलेक्ट्रोंनिक उपकरण सुरू राहिले असेल तर ते घराबाहेर असताना रीमोटच्या सहाय्यानं बंद करता येतं. त्यामुळे निश्चितच आपण एखादा अनर्थ टाळू शकतो. घरातून बाहेर पडण्यापूर्वीच आपण योग्य ती काळजी घेतली तर प्रश्नच निर्माण होणार नाहीत. घरातील अंतर्गत संरचना करत असताना अनेक बाबींचा विचार करून सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाय योजना करता येऊ शकतात. सर्व प्रथम संरचना करताना त्या घरात हवा अधिकाधिक खेळती राहिली पाहिजे हा विचार होणं जरूरीचं असतं. संकट समयी याचा उपयोग अधिक होतो. घरातील फर्निचर हे अधिकतर लाकूड आणि प्लायवूड वापरुनच केलं जातं. अनेकदा वायरिंगचं काम करताना त्यामुळे विशेष काळजी घेणं जरूरीचं असतं. आपल्या घरात अत्यंत महत्वाच्या कागद पत्रांसाठी निदान एखादं छोटंसं फायरप्रूफ फायलिंग कॅबिनेट (एफआरएफसी) असावं. घरामध्ये कोणत्याही कारणामुळे आगीचा धोका निर्माण झाला तर त्वरित काही जुजबी उपाय योजना उपयोगात आणणे उपयुक्त ठरतं. विजेच्या उपकरणांची निवड करत असताना विशेष काळजी घ्यावी लागते.
  • घरातील सुरक्षेसाठी उपलब्ध विविध पर्याय : घराच्या अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टीकोंनातून विजेची उपकरणे तसेच स्वयंपाक घरातील गॅस या दोन्ही बाबींमुळे आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा या कारणांमुळेच काही अपघात घडल्याचे आपण ऐकत असतो. तत्सम घटना घडल्याच तर काही  त्वरित उपाय योजना करण्यासाठी आपलं घर आणि त्यावेळी घरात उपस्थित असणारी व्यक्ति सज्ज असली पाहिजे तसेच त्या परिस्थितीचा सहजरीत्या सामना करू शकली पाहिजे. गॅसच्या बाबतीत आपण स्वतः आवश्यक ती काळजी जरूर घेऊ शकतो परंतु विजेच्या उपकरणांची काळजी घेणं हे त्यासंबंधी माहिती असेल तरंच शक्य होऊ शकतं. गृह सजावट करताना अनेकदा विद्युतीकरण आणि लाकडी फर्निचर यांचं काम एकत्रितपणे केलं जात असतं.  अशा वेळेला वापरल्या जाणार्‍या मालाची निवड नीट केलेली असणं आवश्यक असतं.  
  • प्रगत तंत्रज्ञान वापरुन बनवलेली सुरक्षेची उपकरणे : सद्य:स्थितीतबाजारात प्रगत तंत्रज्ञान वापरुन बनवलेली संगणकीकृत सुरक्षिततेची विविध उपकरणे उपलब्ध आहेत. काही उपकरणांचा वापर आपण आपल्या मोबाइलद्वारे कोठूनही करू शकतो. क्लोज सर्किट टी व्ही कॅमेराच्या सहाय्यानं आपल्या मोबाइलवर देखील आपण घरातील अथवा प्रवेशद्वाराच्या ठिकाणच्या हालचाली आणि घडणार्‍या  घडामोडी बघू शकतो. अलार्म सिस्टिम देखील प्रवेश द्वाराला बसवता येऊ शकते. स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म अशा आधुनिक वस्तु देखील हल्लीच्या दिवसांमध्ये गृह सजावट करताना विचारात घेणं उपयुक्त ठरतं.   

अशा अनेकविध बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करून आपल्या घराची सुरक्षिततेच्या बाबतीत उपाय योजना करावी लागत असल्यामुळे एकूणच अंतर्गत सजावट करण्याचं स्वरूप मर्यादित न राहता व्यापक आणि अत्यंत आधुनिक होऊ शकतं. सुरक्षितता ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन केलेलं गृह सजावटीचं काम निश्चितच आपलं निराळंपण आणि सतर्कता सिद्ध करू शकणार आहे.

— विद्यावाचस्पती विद्यानंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत