घर तिघांचं-दोन खोल्यांचं

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घरांच्या किंमती आणि वाढत जाणारे दैनंदिन खर्च यामुळे सामान्य व्यक्तिला घराची घरघर संपवण्यासाठी काही पर्याय उपलब्ध होणं आवश्यक झालं आहे. ही  घरघर प्रेत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याप्रमाणे अनुभवली जात असते. घर पाहावं बांधून अथवा विकत घेऊन असं म्हणतानाच पै पै जमवलेली जमापुंजी आपल्या घरासाठी वापरताना मुख्य म्हणजे ती मिळवताना आणि जमवताना अनुभवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहात नाही. आपलं घराचं स्वप्न साकार होताना आपल्याला मिळणारा आनंद निश्चितच निराळा असतो. या दृष्टीकोणातून घरांची संरचना साकारण्याची आणि कमीत कमी जागेत किमान गरजांची पूर्तता होईल अशी घरं निर्माण करण्याची गरज विशेषतः महानगरांमध्ये भासत आहे. महानगरांमध्ये दिवसेंदिवस जागेचा प्रश्न बिकट होत चालला आहे. याचा विचार करता केवळ दोन खोल्यांचे घर तयार करण्याला प्राधान्यक्रम देण्याची वेळ आली आहे. ज्यायोगे कमी किंमतीमध्ये देखील किमान गरजांची पूर्तता करणारं घर सामान्य व्यक्तिला घेणं शक्य होऊ शकेल.  

ज्याप्रमाणे घरांचं आकारमान हळूहळू बदलत चाललं आहे तसंच कुटुंबाचा आकारही लहान होत चालला आहे. पूर्वी मोठ्या कुटुंबांसाठी मोठ्या घराची आवश्यकता असे हल्लीच्या छोट्या कुटुंबासाठी घरही छोटं असलं तरी ते पुरेसं ठरू शकतं. वाढती महागाई, वाढत्या दैनंदिन गरजा, जागांच्या वाढत्या किंमती, कमी होत जाणारा कुटुंबाचा आकार अशा अनेक बाबीचा विचार करता “घर तिघांचं-दोन खोल्यांचं” ही काळाची गरज होऊ लागली आहे. अर्थात असा विचार सद्य:स्थितीत अनेक महानगरांमध्ये विविध गृहनिर्माण संस्था आणि त्यांचे विकसक करायला लागले असून प्रशस्त घरांपेक्षा केवळ दोन खोल्यांच्या म्हणजेच वन रूम किचनच्या घरांची संरचना साकारली जाऊ लागली आहे. त्यांच्या माफक किंमतींमुळे जनसामान्य अशा घरांना पसंती देऊ लागले आहेत. विशेषतः विभक्त कुटुंबांमध्ये सर्वसामान्य व्यक्ति आपल्या स्वप्नातलं घर साकारलं जावं म्हणून अशी घरं घेण्यासाठी तत्परता दाखवतात. आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी घराची जरूरी असतेच पण त्या घराला घरपण आणण्यासाठी गृह सजावट अधिक आवश्यक असते.

आपल्याला उपजतच असणारी सौंदर्यदृष्टी आपल्या घराच्या सजावटीसाठी वापरून आपण एका निराळ्या भावनाविष्काराच्या माध्यमातून आनंद मिळवू पाहातो. यासाठी नाविन्यपूर्ण काम करण्याकडेच आपला कल असतो. सर्वसाधारणपणे जे काही इतरत्र पाहायला मिळतं त्यापेक्षा काहीतरी हटके असं आपल्या घराच्या अंतर्गत सजावटीसाठी आपण शोधत असतो. कारण नव्याची नवलाई आपल्या सर्वांनाच हवी हवीशी वाटत असते. आपल्या प्रयोगशील मनालाही नवं काहीतरी आणि ते देखील नव्या प्रकारे कसं वापरता येईल हे अनुभवायचं असतं. आणि मग शोध सुरु होत जातो. त्यासाठी बाजारात फेरफटका मारणं हा तर आपल्या अनेकांच्या आवडीचा विषय असतो. याच बरोबर फर्निचर शोरूम्स मनसोक्तपणे बघितल्या जातात. गृहसजावटीवरील पुस्तकांची दुकानं पालथी घातली जातात. आपल्या परिचितांना त्याविषयी काही माहिती आहे का हेही चाचपलं जातं. पण काहीवेळा हे सर्वकाही आपल्याला संभ्रमात टाकणारं असू शकतं, हे जेव्हा कळतं तेव्हा मात्र एखाद्या व्यावसायिक अंतर्गत संरचनाकारला भेटून त्याचा त्या बाबतीत सल्ला घेणं अधिक संयुक्तिक असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्याच्याकडे असलेला नवसंकल्पनांचा खजिना तो आपल्या पुढ्यात जेव्हा उघडा करतो तेव्हा खऱ्याखुऱ्या सौंदर्याचा साक्षात्कार आपल्या घरात होणार असल्याची आपल्याला खात्री पटते. अनेकदा ज्या गोष्टींचा विचार आपल्या अंतर्मनाला कधी शिवला नाही ते मग साक्षात आपल्या घरात आणि तेही आपल्या डोळ्यांसमोर साकारायला सुरुवात होते.

असाच एक अनुभव माझ्या संपर्कात आलेल्या एका छोट्या कुटुंबाचा आहे. त्यांचं कुटुंब चार जणांचं म्हणजे हम तो हमारे दो असं. एका सरकारी कार्यालयात नोकरी करणारे श्री. सुधीरराव त्यांची मराठी माध्यमाच्या खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करणारी पत्नी सौ. सुलभा, एम. कॉमच्या शेवटच्या वर्गात शिकणारा मुलगा सौमित्र आणि संगीत हा विषय घेऊन एम ए करणारी सुनीता मुलगी; असा त्यांचा परिवार. सुमारे ४० वर्षे भाड्याच्या घरात राहणार्‍या श्री. सुधीररावांनी एका महानगरात एक छोटेखानी वन रूम किचनचं घर विकत घ्यायचं ठरवलं अर्थात तेही त्यांच्या मुलासाठी. सौमित्रचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला त्यांच्याच जागेवर नोकरी मिळावी असा त्यांचा एकीकडे प्रयत्न सुरू होता तर दुसरीकडे सुनीताच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू होते. या सर्वसाधारण परिस्थिति असलेल्या घरात एकूण चार जण होते त्यांपैकी सुनीता लग्न झाल्यावर सासरी जाणार होती आणि सौमित्रचं लग्न झाल्यावर त्याची भावी पत्नी घरी येणार होती. म्हणजेच कुंटुंबाचं आकारमान काही बदलणार नव्हतं केवळ दोनच व्यक्तिमद्धे बदल होणार होते.

श्री. सुधीररावांना आपल्या भावी सुनेने आणि सौमित्रने लग्न झाल्यानंतर भाड्याच्या जुन्या घरात राहावं हे अपेक्षित नव्हतं. केवळ त्यांच्यासाठीच त्यांनी तोपर्यंत जमवलेली जमापुंजी घरासाठी वापरायची ठरवली. त्यांना निवृत्त होण्यासाठी देखील जेमतेम थोडेच महीने राहिले होते. श्री. सुधीरराव आणि सौ. सुलभा यांच्यात याबाबतीत एकमत होतं. त्या उभयतांना त्यांनी संसार उभा केलेलं घर सोडून दुसरीकडे जाण्याची मानसिक तयारी नव्हती. ज्या दिवशी या कुटुंबाची आणि माझी भेट झाली त्याच दिवशी मला देखील त्यांच्याच कुटुंबातला मी एखादा सदस्य असल्यासारखं वाटू लागलं.  

त्यांच्यासाठी त्यांनी घेतलेल्या घराचं स्वप्नं साकार होणं जितकं महत्वाचं आणि आनंदाचं होतं तितकंच त्या वन रूम किचनच्या घराचं अंतर्गत संरचनेचं काम करून घेणं त्यांना कठीण वाटत होतं. एकतर घर विकत घेण्यासाठी मोठी रक्कम मोजल्यानंतर गृहसजावट कशी करता येणार ? आणि आपल्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबाला गृहसजावट करणं परवडणार आहे का ? किती खर्च येईल ? फसगत तर नाही ना होणार ? सुरूवातीला ठरवलेल्या रक्कमेत काम पूर्ण होऊ शकेल का ? काम सुरू झाल्यावर थांबता येणार नाही आणि खर्च आवाक्याबाहेर गेला तर काय करायचं ? नंतर जास्तीच्या कामाचे पैसे कोठून आणायचे ?  काम अर्धवट टाकून पळून जणार्‍याला कोठे शोधणार ? अशा एक ना अनेक शंकांमुळे आणि अनेकांकडून अशा स्वरुपातील काही किस्से ऐकल्यामुळे यांतील खरे-खोटे काही त्यांना उमगत नव्हते. त्यामुळे विश्वास कोणावर ठेवावा हे कळत नव्हतं. एका वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेला माझा लेख वाचून त्यांनी मला एकदिवस संपर्क करण्याचं ठरवलं. त्या संपर्कातूनच आमचं भेटीचं निश्चित झालं.

प्रत्यक्ष भेटीत त्यांच्या सर्वच शंकांची उत्तरे त्यांना मिळू शकली आणि गृह सजावटीच्या कामाचा त्यांचा निर्णय झाला. सुरूवातीला आम्ही केवळ दोन वेळा आणि तेही दोन दोन तास भेटलो. अनेक बाबींवर चर्चा केली. त्या चर्चेतून अनेक कामे निश्चित केली गेली. नंतर प्रत्यक्ष जागेची मोजमापे घेऊन अंतर्गत संरचनेचं आणि त्या संबंधी नकाशा बनवण्याचं काम सुरू केलं. सुरूवातीला झालेल्या दोन वेळच्या भेटींतून आणि चर्चेतून त्यांच्या अपेक्षा, गरजा, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद, मित्र परिवार, सामाजिक स्तर, जीवनशैली, त्यांचे लौकिक आणि अलौकिक गुण अशा अनेक बाबींची माहिती मिळाली. परंतु सौमित्रची भावी पत्नी कोण आणि कशी असेल किंवा तिच्या गृह सजावट आणि तिचं घर म्हणून काय अपेक्षा असतील, हे काही समजणे शक्य नव्हतं. कोणीही असली तरी केवळ ती नोकरी करणारी असेल इतकच सौमित्रनं ठरवलेलं होतं.

या सर्व बाबींचा विचार करून त्यांच्यासाठी वन रूम किचनच्या घराला वन बेडरूम, किचन आणि हॉल असं स्वरूप दिलं. आवश्यक त्या अंतर्गत बदलांमुळे ते शक्य झालं. सुरूवातीला घर ताब्यात मिळालं तेव्हा ते केवळ दोनच खोल्यांचं होतं, एक किचन आणि हॉल. अर्थातच दर्शनी भागात हॉल आणि आतील बाजूस किचन. त्यात केलेले बदल आपल्याला सोबतच्या छायाचित्रात दिसतील. सोबतच्या चित्रातील नकाशाप्रमाणे दर्शनी भागात हॉल त्याच्याच मागे छोटं किचन आणि आतील बाजूस बेडरूम. बेडरूमला जोडून कॉमन टॉयलेट ब्लॉक अशा स्वरुपातील बदल त्या घरात घडवून आणण्याचं ठरवलं.

  • संरचनेमागची मूळ संकल्पना:

सौमित्र आणि त्याची भावी पत्नी हे दोघेही नोकरी निमित्त दिवसभर बाहेर असतील असं गृहीत धरून त्यांना फार मोठ्या किचन तसेच लिव्हिंग रूमची जरूरी असणार नाही. सकाळी त्या दोघांपुरतं जेवणाचं बनवणं आणि डबा भरून ते घेऊन जाणे हे सुट्टी खेरीज रोजच असणार आहे. त्यादृष्टीकोनातून त्यांच्या किचनची संरचना करायची ठरवली. सौमित्रला देखील निरनिराळे पदार्थ बनवण्याची आवड आहे. त्यामुळे लग्नानंतर सौमित्र आणि त्याची भावी पत्नी दोघेही किचनमध्ये काम करू शकतील इतपत जागा विचारात घेऊन उर्वरित जागेत दर्शनी भागात छोटेखानी बैठक व्यवस्था करावी असा विचार केला. ऑफिसमधून आल्यावर केवळ क्षणभर विसावा घेण्यासाठी तसेच त्या दोघांकडे कोणत्याही कामानिमित्त कोणी आल्यास त्यांना बसण्यासाठी आवश्यक इतकंच काम गृह सजावटीच्या दृष्टीने तिथे करावं असं ठरलं. त्यांना खरी गरज असणार आहे ती म्हणजे ऑफिसमधून दिवसभर काम करून घरी आल्यावर रात्रीचं जेवण आणि शारीरिक-मानसिक विश्रांतीची, प्रायव्हसीची, मानसिक आणि शारीरिक सुख, समाधान आणि शांतीची. या सर्व बाबींचा विचार करून त्यांच्यासाठी बेडरूम ही इतर दोन्ही जागांपेक्षा आकाराने मोठी, त्यांच्या व्यक्तीगत सामानासाठी आवश्यक त्या सोई सुविधा त्याच प्रमाणे त्यांच्या भावी आयुष्यातील येणार्‍या पाहुण्यासाठी म्हणजेच त्यांच्या आपत्याच्या आगमनामुळे लागणार्‍या अनेक गोष्टींचा विचार करून त्यांच्या बेडरूमची संरचना साकारली. त्यांच्या बेडरूमला जोडलेलं टॉयलेट देखील याच विचाराने केवळ बेडरूमच्या जवळ असल्याने सहज वापरता येण्याजोगं आहे.

  • घरातील फर्निचर:

सपूर्ण घरातील फर्निचर जितकं शक्य होईल तितकं सुटसुटीत, आवश्यकतेनुसार एका जागेवरून दुसर्‍या जागेवर हलवता येण्याजोगे बनवण्यात आलं. ते शक्य तितके स्वस्त आणि मस्त असेल अशाच पद्धतीनं बनवलं. मुळातच ज्या वस्तूंची आणि फर्निचरची जरूरी होती त्यांचाच वापर गृह सजावट करताना केला. कमीत कमी जागेत परंतु तरीही अधिकाधिक उपयुक्त ठरतील अशीच कामे करून घेतली. उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करून त्यांच्या मालमत्तेचं एकूणच शास्त्रीय व्यवस्थापन केलं गेलं. अनेक वस्तु तर टाकाऊ मधून टिकावू स्वरुपातील तयार करून घेतल्या. हॉलमध्ये केवळ शू रॅक आणि चार जणांसाठी बैठक व्यवस्था. या शिवाय केवळ किचन आणि हॉल यामधील लाकडी पार्टीशनवर शोभेच्या वस्तू मांडता याव्यात म्हणून काचेचे लहान लहान शेल्व्स बसवण्यात आले. किचनमध्ये ओट्याच्या खाली ट्रॉलिस्टोअरेज. अशा प्रकारे एकूणच सर्व सामानाची मांडणी केली.  

  • विशेष वस्तूंची निवड:

 अगदी लहान सहान वस्तूंच्या निवडीपासून त्या आणून लावण्यापर्यन्त अनेक बाबींचा विचार केला. यांत भिंतीवरील घड्याळ असेल नाहीतर बेडरूममध्ये लावण्यात आलेला एलईडी टीव्ही असेल. घराच्या सर्व जागांमधील रंगकाम, प्रकाश योजना, उपयुक्ततेच्या दृष्टीने निवड केलेल्या गृह सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू अशा अनेक बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करून वापरल्या.  

आज अनेक वर्षे होऊन गेली तरीही त्यांना केवळ पुन्हा एकदा रंगकाम करावं लागलं. आजही त्या घरी गेलं की असं वाटतं की त्यांच्याकडील गृह सजावटीचं काम अगदी नुकतेच झालं असावं. त्या घरात प्रवेश केल्यावर घराचं आकारमान केवळ दोनच खोल्यांचे आहे असंही वाटत नाही. घर लहान आहे की मोठं याहीपेक्षा त्याच्या संरचनेचं काम कसं केलं आहे ते अधिक महत्वाचं. लहान जागेचा सुद्धा अत्यंत कल्पकतेने पुरेपूर वापर करून आपल्या प्रार्थमिक मूलभूत गरजांची पूर्तता करता येते.

— विद्यावाचस्पती विद्यानंद              

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत