बुध्यांक चाचणी – तथ्य आणि पथ्य

Classroom, School Building, Smiling, Computer

करिअरची निवड हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा असतो. अनेकांच्या करिअर निवडीच्या संकल्पना ह्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर ठरलेल्या असतात. बदलत असलेले जीवनमान, वाढत जाणाऱ्या गरजा आणि अपेक्षा, स्पर्धेची समस्या अशा अनेक कारणांमुळे करिअर निवडीच्या बाबतीत अनेक भ्रम आणि संभ्रम निर्माण होत जातात. उपलब्ध असलेले अनेक पर्याय, आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या अनुभवाच्या, मार्गदर्शनाच्या काही सूचना ह्या सर्वांमुळे विध्यार्थी आणि पालक संभ्रम निर्माण होऊन हतबल होतात. सध्याच्या शिक्षण पद्धतीनुसार प्रत्येकाला दहावी, बारावी आणि पदविका अथवा पदवी करण्याचे प्रामुख्याने तीन शाखांचे पर्याय उपलब्ध आहेत. विज्ञान, वाणिज्य आणि कला ह्या तीन मुलभूत शाखांपैकी दहावीच्या शिक्षणानंतर एका शाखेची निवड करावी लागत असते.

आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि प्रत्येक अनुभव सुखद असण्यासाठी आवश्यकता असते ती योग्य करिअर निवडून अर्थार्जन करण्याची, पैशाच्या योग्य वापराची, बचतीची आणि गुंतवणुकीची. प्रत्येकाच्या जशा गरजा वेगवेगळ्या असतात तसंच उत्पन्न अथवा आपल्या हाती येणारा पैसा देखील कमी-अधिक प्रमाणात आपल्या पदरी पडत असतो. खरं कसब आपल्या करिअर निवडण्यात असतं. जो योग्य करिअरची निवड करतो तोच अर्थार्जन उत्तम प्रकारे करू शकतो. योग्य करिअरची निवड करण्याच्या अगोदर प्रत्येक विद्यार्थ्याचा कल समजून घेणे जरुरीचे असते. त्याची ठराविक वयांत बुध्यांक चाचणी करवून घेणे उपयुक्त ठरत असते.  

बुध्यांक चाचणी ही एकप्रकारे कलचाचणी असते. कलचाचणीचा निकाल हा तुम्ही दिलेल्या प्रामाणिक उत्तरांवर अवलंबून असतो. त्यामुळे जर तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरे दिली नसतील तर ह्या निकालाला महत्व देवू नये. कलचाचणीमध्ये बुध्यांक, आवड, विश्लेषणक्षमता, भाषाप्रभूत्व, कल्पकता, मनोविश्व इ. अनेक गोष्टींचा विचार केलेला असतो. यावरून त्या व्यक्तीचा कल नेमका कोणत्या क्षेत्रात आहे ? हे ताडलं जातं. तसंच ह्या कलचाचणीनुसार कोणती व्यक्ति सर्टीफिकेट्/डिप्लोमा/डिग्री या स्तरासाठी योग्य आहे ? ते ही समजतं. 

  • बुध्यांक चाचणी – तथ्य आणि पथ्य

ही बुध्यांक चाचणी म्हणजेच कलचाचणी शाळांमध्ये घेणं शक्य असतं. शाळांमध्ये मुलं शिकत असतानाच त्यांची मानसिक कुवत त्या त्या शाळांमधील शिक्षकांना लक्षात येऊ शकते. त्यांचा शालेय जीवनात एकूणच कल कशात आहे ? हे पाहणं त्यांच्या शिक्षकांना सहज समजून घेता येतं. परंतु अनेक शाळांमध्ये या कलचाचणीची सोय नसल्याचं दिसून येतं. अनेक मुलांकडे शब्दसंग्रह नाही, म्हणून उत्तम संभाषणकौशल्य नसल्याने त्यांना आवड असणार्‍या क्षेत्रात न जाण्यास सांगण्यात येतं. ज्या प्रांतात आपण अभ्यास वाढवून कौशल्य मिळवू शकतो त्यात आज जरी काही न्यूनता असली अथवा काही उणिवा असल्या तरीही कालांतराने त्यात अशी मुलं निश्चित प्रगती करु शकत नाहीत का? ही कलचाचणी कधी घ्यावी? हे देखील विचार करण्यासारखं आहे. लहान वयात इतक्या लवकर या कलचाचण्या घेणं आवश्यकच नाही तर योग्य तरी आहे का?  याचाही विचार आज होणं अत्यंत जरुरीचं आहे. अनेकदा पालकच आपल्या पाल्यांच्या अशा प्रकारच्या चाचण्या करून घेण्यास आग्रही असतात. अर्थात अशा चाचण्या करून घ्याव्यात का? आणि त्या कधी करून घ्याव्यात ? या बाबतीत पालकांनी विवेकी विचार करणं जरुरीचं असतं. या बुध्यांक चाचणीची गरज नाही असंही निश्चितच नाही.

या बुध्यांक चाचणीची गरज तसं पाहता अगदी लहानपणापासून असते, असं म्हंटलं, तरीही वावगं ठरणार नाही. या चाचणीची सुरुवात आपल्या घरापासून करता येऊ शकते. चाचणी घेताना अगदी विविध खेळांच्या आधारे देखील या घरी घेता येऊ शकतात. याद्वारे आपल्या मुलांचा नेमका कल कशात आहे ? याचा अंदाज निश्चितच आपल्याला घेता येऊ शकतो. फक्त त्यासाठी जरूरी आहे; आपल्या निरीक्षणाची, परीक्षणाची आणि त्यानंतरच्या समीक्षणाची. विविध खेळांच्या माध्यमातून आपल्याच घरात मुलांच्या प्रत्येक कृतीचं बारकाईनं निरीक्षण करत राहणं यात अपेक्षित आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीवर आपल्या निरीक्षणाच्या सहाय्यानं परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि या सर्वांची नेमकेपणाने समीक्षणे म्हणजेच बारीक सारिक टिपणं लिहिली गेली पोहिजेत. या सर्व प्रक्रियेतूनच आपल्याला आपल्या मुलांचा कल कशात आहे ? हे समजणे शक्य होतं. अर्थातच या सर्वांची सुरुवात आपण त्यांच्याशी संवाद साधून करणं आवश्यक आहे. हल्ली अनेक घरांमध्ये संवादच फारसे घडत नाहीत.    

  • प्रवेश परीक्षा एक प्रकारे बुध्यांक चाचण्याच

शालेय शिक्षण दहावीपर्यन्त केल्यानंतर तसेच बारावी नंतर काही अभ्यासक्रमांसाठी प्रबेश परीक्षा घेतल्या जातात. त्यादेखील एकप्रकारे बुध्यांक चाचणी अथवा कलचाचणीचाच भाग असतात.  महाराष्ट्र राज्याच्या तसेच इतर राज्यांच्या इंजिनियरिंग, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी सीईटी, जेईई-मेन, सीयूसीईटी, एआयईईई, कॅट, आयआयटी-जेईई, एआयपीएमटी, डीबीएन-सीईटी, जेईई-अडव्हान्स, एनएटी, व्हीआयटीईईई, ईएनएटी, बीआयटीएसआयटी, एनईएटी, एएमआयई अथवा एनएटीए(नाटा) इत्यादि विविध बुध्यांक चाचण्या अथवा कलचाचण्या घेतल्या जातात. अर्थात या खरं तर त्या त्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेच्या परिक्षाच असतात.

  • करायला गेलो एक आणि झालं भलतेच……..

अनेकदा असं घडतं की मुलांचे पालक मोठमोठी डोनेशन्स अथवा क्यापिटेशन फी भरून  खाजगी पोंलिटेक्निक अथवा इंजिनीयरींग कॉलेजमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळवून देण्याची क्षमता आहे म्हणून मुलं इंजिनीयरींगला जातात. पुढे एक तर कमी गुण मिळवून इंजिनीयरींग पदवीधर होतात किंवा चार वर्षाचा कोर्स कधी पाच वर्षात तर कधी सहा वर्षात कसाबसा पूर्ण करतात. पुढे कॉलेजच्या माध्यमातून प्लेसमेंट त्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे डिझाईन किंवा आयटी मध्ये मिळत नाही. अनेकांचे व्यक्तीमत्व किंवा संवाद कौशल्ये सेल्स इंजिनीयर म्हणून करीयर करण्यायोग्य नसतं. काहीजणांचं व्यक्तीमत्व किंवा संवादकौशल्ये परिणामकारक असूनसुद्धा त्यांना आय टी किंवा डिझाईनमध्येच करीयर करायचं म्हणून इंजिनीयरींग केलेलं असतं. तर काहीजण  आय.टी.आय किंवा पदविका पूर्ण करून ज्या पगारावर नोकरी करतात. यासर्वाच्या जोडीला रिसेशन आणि स्पर्धा या समस्या तर प्रत्येक क्षेत्रात असतातच.

या सर्व कारणांमुळे पालकांचा पैसा विनाकारण खर्च होतोच शिवाय हे इंजिनीयरींग शिक्षणात अमूल्य पैसे आणि वेळ खर्च झालेला असतो आणि काही जणांच्या पदरी निराशा आलेली असते. काही वेळा असं लक्षात येतं की, आपल्या पाल्याची साधारणपणे दहावीत केली जाणारी कलचाचणी पालकांनी केलेली नसते किंवा त्यात काही अर्थ नाही असं म्हणून केवळ दहावीत जास्त मार्क्स आहेत म्हणून बारावीचे शिक्षण शास्त्र शाखेत प्रवेश घेऊन केलं जातं. अलीकडे इंजिनियरिंगच्या जागा रिकाम्या राहतात म्हणून अथवा डोनेशन भरुन प्रवेश मिळवता येतो म्हणूनही अनेकांचा कल या अभ्यासक्रमाकडे असल्याचं दिसून येतं. विद्यार्थ्यांच्याच काय तर पालकांमध्ये सुद्धा आपलं अपत्य इंजिनियरिंगला गेलं  नाही तर समाजातली आपली प्रतिष्ठा कमी होईल असा गैरसमज असल्याचं दिसून येतं. मग आमच्या मुलांनी इंजिनियरींग करुन आय.टी इंजिनीयर होण्याची स्वप्न पहायचीच नाहीत का ? असा एक सर्व साधारण प्रश्न पालकांच्या मनात असणं स्वाभाविक आहे. आणि तसं बघितलं तर त्यांत त्यांचं काही चूक नाही. करिअर निवडण्यासाठी कलचाचणी करावी याबाबत पालकांचा कल किंवा सजकता अथवा जागृती असणं अत्यंत जरुरीचं आहे. बुध्यांक चाचणी अथवा कलचाचणी देऊनही “करायला गेलो एक आणि झालं भलतंच” अशी परिस्थिति निर्माण होऊ न देणं हे सुजाण पालकत्वाचं लक्षण मानावं लागेल. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत