शेअर्समधील गुंतवणूक
“थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे दरमहा दैनंदिन गरजांची पूर्तता करून शिल्लक राहिलेल्या अथवा बचत करून बाजूला ठेऊन दिलेल्या आपल्या पै पैशाची वृद्धी होणं देखील तितकेच अपेक्षित आणि आवश्यक असतं. अनेकदा आपल्याला यासाठी योग्य पर्याय सापडत नाही आणि बचतीचे पैसे एकतर आपल्याकडून खर्चतरी होतात अथवा तसेच पडून राहतात. यासाठी अगदी सोपा आणि सोईस्कर पर्याय म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक. शेअर बाजारात पैसे केवळ बचतीच्या दृष्टीकोनातून जमा करता येऊ शकतात असं नाही तर खूप कमवता येऊ शकतात.
- शेअर बाजाराचे कामकाज
शेअर बाजार हा एक पैसे कमवण्याचा व्यवसाय होऊ शकतो. अर्थातच काहीवेळा अपूर्ण ज्ञानामुळे आणि अति घाइमुळे हा व्यवसाय नुकसानीचा देखील ठरू शकतो. अर्थातच त्यासाठी शेअर बाजाराचे कामकाज कशा प्रकारे चालू असते हे समजून घेणे आवश्यक ठरेल. सद्य:स्थितीत शेअर्सची खरेदी अथवा विक्री करणे अपेक्षित असल्यास सर्वप्रथम एखाद्या शेअर ब्रोकरकडे आपली नोंदणी करावी लागते. होणारे प्रत्येक व्यवहार त्या शेअर ब्रोकरच्या माध्यमातून होत असतात. खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्याचं आपलं काम त्याच्या मार्फत शेअर मार्केटमध्ये केले जाते. अशा प्रकारे व्यवहार करण्यासाठी एखाद्या बँकेत डी-मॅट खाते उघडावे लागते आणि त्याच खात्यातून सर्व आर्थिक व्यवहार करावे लागतात. तसे न केल्यास पेपर स्वरुपात हे व्यवहार करावे लागतात.
- भारतीय शेअर बाजार
भारतात दोन प्रमुख एक्स्चेंजेस शेअर बाजाराच्या दृष्टीकोनातून महत्वाची समजली जातात. एक बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात एनएसई या नावाने ओळखली जातात. या शिवाय एकूण बावीस प्रादेशिक स्टॉक एक्स्चेंजेस भारतात कार्यरत आहेत. असं जरी असलं तरीही बीएसई आणि एनएसई मार्फतच भारतात ऐशी टक्के पेक्षा अधिक व्यवहार केले जातात. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स हे दोन्ही स्टॉक एक्स्चेंजेसवर नोंदवलेले असल्यामुळे दोन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणी शेयर्सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याची सुविधा अनेकदा उपलब्ध असते. मुख्य म्हणजे व्यवहार पूर्ततेचा कालावधी दोन्हीकडे थोडा वेगळा असल्यामुळे गुंतवणूकदार त्याची पोझिशन एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी शिफ्ट करू शकतो.
मुंबई स्टॉक एक्स्चेंजचा प्राथमिक इंडेक्स बीएसई सेंसेक्समध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट आहेत. आणि एनएसई चा इंडेक्स निफ्टी मध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट आहेत. बीएसई सेंसेक्स हा एक जुना इंडेक्स असून तोच अधिककरून गुंतवणूकदारांमध्ये प्रचलित आहे. दोन्ही एक्स्चेंजेस मधील इंडेक्स अंश हे त्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व कंपन्यांच्या मिळून एकत्रित भांडवली मूल्यांवर तसेच रोजच्या रोज क्षणोक्षणी गणले जातात. सेबी म्हणजेच सेक्यूरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया या नियंत्रक संस्थेचे नियंत्रण एकूणच सर्व व्यवहारावर केले जात असते.
आठवड्याचे केवळ पाच दिवसच यामधील व्यवहार केले जातात. सर्वच शनिवारी आणि रविवारी शेअर बाजाराचे कामकाज तसेच सर्व व्यवहार पुर्णपणे बंद असतात. सद्य:स्थितीत होणारे प्रत्येक व्यवहार संगणकाच्या साहाय्याने केले जातात त्यामुळे ते थेट स्वरूपाचे असतात. या व्यवहारांना बीओएलटी (बीएसई ऑन लाइन ट्रेडिंग) म्हणजेच बोल्ट आणि एनईएटी (नॅशनल एक्स्चेंज औटोमेटेड ट्रेडिंग) म्हणजेच नीट या नावाने ओळखले जातात. या संगणक प्रणालींचा उपयोग प्रत्येक व्यवहार जलद गतीने आणि पारदर्शकपणे होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतो.
- डीमॅट खाते कसे उघडाल ?
डी मॅट म्हणजेच डिमटेरियलायझेशन ज्यात गुंतवणूकदाराकडे असलेल्या प्रत्यक्ष सर्टिफिकेट स्वरुपातील शेअर्स डीपोंझिटरी पार्टिसिपेंटकडे इलेक्ट्रोंनिक स्वरुपात ठेवल्या जाणार्या प्रणालीत बदली करून घेऊ शकतो. गुंतवणूकदार त्याच्या नावावर असणार्या सिक्युरिटीज सर्टिफिकेट ज्या डीपोंझिटरी पार्टिसिपेंटकडे डिमटेरियलायझेशनसाठी पूर्वी नोंदवलेल्या असतात त्याच फक्त डी मॅट करू शकतो. सर्वसाधारणपणे बँकेमध्ये बचत खाते जसे उघडले जाते तसेच डीमॅट खाते उघडता येते. असे खाते आपण स्वतः उघडू शकतो अथवा एखाद्या शेअर ब्रोकरकरवी ते उघडता येऊ शकते. शेअर ब्रोकरकरवी असे खाते उघडायचे झाल्यास पुढील प्रमाणे सदरची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
- तुमच्या सोईच्या आणि शक्यतो घराजवळच्या शेअर ब्रोकरकडे जाऊन त्यांच्याकडे उपलब्ध असलेला अर्ज भरून आवश्यक आणि संबंधित सर्व कागदपत्रे सोबत जोडून स्वाक्षरी करून जमा करावा.
- अशावेळेस त्या शेअरब्रोकरबरोबर रीतसर करार करून मगच पुढील व्यवहार करण्यात यावेत.
- सदरचा अर्ज भरताना त्यामधील माहिती आणि सर्व कागदपत्रे परस्परांशी संबंधित असल्याची खात्री करणे आवश्यक असते. काही वेळा नजरचुकीने अथवा घाईगडबडीत अर्जात भरलेली माहिती आणि जोडलेली कागदपत्रे भिन्न असू शकतात. त्याचप्रमाणे पॅन कार्ड, रहात्या जागेचा पुरावा, बँक खात्याचा पुरावा तसेच पैसे भरण्यासाठीचा धनादेश आणि ब्रोकरच्या कमिशनचा निराळा धनादेश स्वता:च्या स्वाक्षरीसह जमा करणे आवश्यक असते.
- एकूणच सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला संबंधित शेअर ब्रोकर तुमचा खाते क्रमांक आणि तुमचा आयडेंटिफिकेशन नंबर देऊ करेल. ज्याची नोंद तुमच्याकडे योग्यठिकाणी करणे आवश्यक असते. कारण हे क्रमांक तुमच्या प्रत्येक व्यवहाराच्यावेळी जरुरीचे असणार आहेत.
- तुम्ही व्यक्तीगत अथवा कुटुंबियांसोबत कितीही डीमॅट खाती उघडू शकता. त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तुमच्या सर्टिफिकेटच्या स्वरुपात असणार्या शेयर्सच्या दुहेरी पद्धतीने नोंदणी झाली असल्यास प्रथम नाव ज्या व्यक्तीचे आहे त्याच व्यक्तीच्या पहिल्या नावाने डीमॅट आणि बँक खाते शक्यतो उघडावे. व्यावहारिकदृष्ट्या ते अधिक सोयिस्कर ठरतं.
- तुमच्याकडे असलेल्या सर्टिफिकेट स्वरुपातील शेअर्सचे डीमॅट कसे करावेत हे समजून घेणे देखील आवश्यक ठरतं. यासाठी डीमटेरियलायझेशनचा अर्ज भरावा लागतो. आपल्याजवळील शेअर सर्टिफिकेटवर संबंधित म्हणजेच सरांडर फॉर डीमॅट असे नमूद करून सदर अर्ज आपल्या शेअर ब्रोकरच्या मार्फत पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा लागतो. सुमारे पंधरा दिवसात तुमच्या डी मॅटच्या खात्यात तुमचे शेअर्स जमा होऊ शकतात. याचप्रमाणे एका डी मॅट खात्यातील शेअर्स दुसर्या डी मॅट खात्यामध्ये ट्रान्सफर करता येऊ शकतात. सेबीच्या सूचनेनुसार शेअर्सशी संबंधित अनेक कंपन्यांचे होणारे व्यवहार डी मॅटच्या माध्यमातूनच असणे अनिवार्य झाले आहे.
- डीपोंझिटरी ही एक अशी संस्था असते की जी गुंतवणूकदाराच्या सिक्युरिटीज इलेक्ट्रोंनिक स्वरुपात सांभाळून ठेवते. त्यामुळे या संस्थेला सिक्युरिटीज बँक असेही म्हंटले जाते. भारतात एनएसडीएल आणि सीडीएसएल अशा दोन मुख्य संस्था सिक्युरिटीज बँकेचे काम करत आहेत. अर्थात या संस्थेला आपण असे नाव दिले असले तरीही प्रत्यक्ष पैशाची जोखीम न घेता केवळ शेअर्स तसेच अन्य स्वरुपातील भांडवली सिक्युरिटीज हाताळत आणि सांभाळत असते. गुंतवणूकदाराला अशा प्रकारे व्यवहार करण्यासाठी उघडावे लागणारे खाते म्हणजेच खरं तर डी मॅट खाते होय.
- डी मॅट खाते उघण्याचे फायदे
- सर्टिफिकेट हरवण्याचा धोका नाही कारण सर्व व्यवहार संगणकीकृत असतात.
- ड्यूप्लिकेट सर्टिफिकेटसाठी शेअर ब्रोकरकडे पाठपुरावा करावा लागत नाही.
- शेअर ट्रान्सफरच्या वेळी 0.5% स्टॅम्प ड्युटीची बचत होते.
- चुकीच्या, खोट्या आणि वाईट व्यवहारांना पूर्णतः पायबंद बसतो.
- कुरीयर तसेच पोस्टेजचा खर्च करण्याची गरज भासत नाही.
- त्वरित म्हणजेच तात्काळ ट्रान्सफर होत असल्यामुळे कामात सुलभता येते.
- दलालीचा खर्च केखील कमी येतो.
- बोनस आणि राईट शेअर्स डी मॅट खात्यात विना विलंब जमा होतात.
- डी मॅट स्वरुपातील शेअर्स गहाण ठेवून कर्ज घेतल्यास कमी व्याज दराचा फायदा मिळवता येतो.
- अधिक कर्ज उपलब्ध होते. सर्वसाधारणपणे 75% पर्यन्त सहज कर्ज मिळू शकते.
- बाजारातील चढ उतार
बाजारातील चढ उतारावर म्हणजेच अस्थिरतेवर मर्यादा असावी म्हणून सेबीने काही नियम केलेले आहेत आणि किमतींनुसार दिवसातील कमाल तसेच किमान दरातील फरक ठरविलेला आहे. त्या अनुसार ज्या शेअर्सचा दर रु. 10 ते रु. 20 च्या दरम्यान आहे त्यांची किमत दिवसभरात 25% पर्यंतच कमी अथवा जास्त होऊ शकते. त्या शेअर्सचा दर रु. 10 पेक्षा कमी आहे त्यांची किंमत दिवसभरात 5% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. ज्या शेअर्सच दर रु. 20 पेक्षा जास्त आहे त्यांची किंमत दिवसभरात 8% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. गुंतवणूक करताना बाजारातील चढ उतराचा अभ्यासपूर्वक अंदाज घेणं जरुरीचे ठरते. त्याच बरोबर शेअर्सच्या अर्जावरील सर्व तपशील नीट वाचून आणि पुर्णपणे समजून घेऊन मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा कारण अशा प्रकारच्या गुंतवणुकीत मोठी जोखीम घेवून निर्णय घेतला जात असतो.
भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड इंडिया एक्ट, १९९२ चे अनुसार स्थापन करण्यात आलेल्या सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्या पुढील संकेतस्थळावर शेयर्सच्या खरेदी-विक्रीच्या नियमनांच्या संबंधी सविस्तर माहिती मिळवता येऊ शकते. संकेतस्थळ : www.sebi.gov.in
— विद्यावाचस्पती विद्यानंद