संवादाच्या माध्यमातून मिळणारे समाधान सुखदच
अलीकडच्या सोशल मिडीयाच्या आभासी जमान्यांत हे नेटवर्क खरंच नीट वर्क करत आहे का? असा नेहमी प्रश्न पडतो. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉटस् अॅप इत्यादींच्या माध्यमांतून आपण एकमेकांशी आणि एकाच वेळी अनेकांशी कनेक्टेड असतो खरे, पण परस्परांच्या दु:खात नाही तर सुखांत तरी आपण खरंच कनेक्ट होतो का? आपल्या व्यक्त होण्यांत काहीतरी कमी असल्याचं नाही का हो जाणवत? त्यांतही खूपच औपचारिक संबंध आणि संवाद होत राहतात, असंही वाटत नाही का? आणि त्या कनेक्ट होण्यांत खरंच थेट संवादाचं सुख मिळतं का? ह्या माध्यमातून पुरावा निश्चितच मिळेल पण दुरावा वाढतोय यांत यत्किंचितही शंका नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या केवळ शारीरिक मूलभूत गरजा असतात, मात्र संवाद ही आपल्या अंतर्मनाची मूलभूत गरज असते.
“संवाद” म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर विचारांचं आदानप्रदान, एकमेकांना भावनिक आणि मानसिक पातळीवर समजून घेणं. ह्या संवादांत दुसऱ्याचं बोलणं, विचार, मत समजण्यासाठी ऐकून घेणं जरुरीचं असतं. अनेकदा समजून घेण्यापेक्षा समजून सांगण्यासाठी आपण उतावीळ असतो. दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते, तशीच दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा आपल्या अंतर्मनाची गरज असते, हे समजून घेणं आवश्यक असतं. ह्या विचारांच्या देवाणघेवाणीमुळे आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो, अर्थात वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते, सृजनशीलतेला नवे पैलू पडत जातात, ज्ञानात भर पडत जाते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं आणि उणिवांचं स्वतःला मूल्यांकन करता येतं. आपलं मानसिक आरोग्य सद्रुढ रहातं, हे महत्वाचं आहे. अर्थात, संपन्न व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक असतं आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज असते, हे समजून घेणं आवश्यक आहे,
व्यक्त होणारीच व्यक्ती असते, अशाच व्यक्तीचं व्यक्तिमत्व चार चौघांपेक्षा निराळं असतं. हे व्यक्त होणं म्हणजेच एकप्रकारे संवाद साधणे असतं. प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याची अपेक्षा, आवश्यकता, जरुरी, गरज असतेच. कितीही कोणीही ठरवलं तरीही मौन पाळणे जमत नाही. जरी तसं ठरवलं आणि प्रयत्न केला तरीही फार काळ मौनांत राहणं शक्य होत नाही. व्यक्तिगत पातळीवर संवादाची गरजच नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. शरीरानं एकटी असणारी व्यक्ती जेव्हा मानसिक पातळीवर देखील एकलेपण अनुभवायला लागते, तेव्हा कोणा-ना-कोणाशीतरी संवाद साधण्याचा विचार करतेच. आपल्या मनांतील विचार, आलेले अनुभव, नवीन योजना, भोगलेला त्रास आणि दु:ख तसंच आनंद शेअर केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. सोशल मीडियाद्वारे का होईना, पण हे सर्व निरनिराळ्या आणि स्वतःला शक्य होईल त्या प्रकारे व्यक्त केलं जाऊ लागतं.
संवाद म्हणजे आपल्या जिवंतपणाचं एक महत्वाचं लक्षण मानलं जातं. अगदी आपल्या दैनंदिन जीवनांतील दोन बाबींची आपल्या संवाद साधण्याच्या गरजेशी तुलना करूयात. स्वयंपाक करताना गॅसवर ठेवलेल्या प्रेशर कुक्करमध्ये काही वेळांतच खूप वाफ कोंडली जाते. ती वाफ कुकरच्या शिट्टीद्वारे बाहेर फेकली जात असते. परंतू जर ती वाफ बाहेर पडायला वाव मिळाला नाही; तर कदाचित कुकरचा स्फोट होईल. संवादाच्या बाबतीत नेमकं तसंच होत असतं. त्याचप्रमाणे, एखाद्या डबक्यात पाणी साचून राहिलं असेल, त्यांत बाहेरून पाणी येण्याची काही शक्यता देखील नसेल आणि साचून राहिलेलं दुषित पाणी बाहेर जाणारा मार्गही नसेल, तर त्या डबक्यात साचून राहिलेलं पाणी आतल्या आत कुजून जाईल, त्या पाण्यांत किडे पडतील, वास आणि दुर्गंधी येऊ लागेल. हे टाळण्यासाठी पाण्याचा निचरा होऊ देणं जसं महत्वाचं असतं, तसंच आपल्या अंतर्मनाचं देखील असतं. आपल्या अंतर्मनांत येणाऱ्या विचारांना आपण वेळोवेळी मोकळी वाट करून द्यायची असते, विचारांची देवाणघेवाण करायची असते. आपल्या भावनांना वाट मिळाली कि एक प्रकारे अंतर्मनांत आनंद प्रसूत व्हायला लागतो. ह्याच कारणास्तव आपल्याला संवादाची गरज असते.
मनांत येणाऱ्या अनेक विचारांना वाट करून देण्याची गरज असते, त्यांना मोकळं करण्याची जरुरी असते. बोलून दाखवलेल्या मनांतील विचारांमुळे मनावरचा ताण हलका होतो. आपल्या मेंदूत साठवलेले, आठवलेले अनेक विचार, विषय ड्रेन करण्याची आवश्यकता असते. जसं, सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजचा वापर करावा लागतो, अगदी तद्वतच मनांत आलेल्या विचारांना देखील अधूनमधून ड्रेन करणं जरुरीचं असतं. संवाद हा माणसाच्या जीवनात निरंतर असावा लागतो. सुयोग्य पध्दतीनं, नेमकेपणानं केलेल्या संवादामुळे त्या व्यक्तीला समाजात सन्मानाचं स्थान मिळतं. केवळ बोलणं म्हणजे संवाद होत नाही. निरुद्देश, निरर्थक केलेली वायफळ बडबड ऐकायची कोणाचीही इच्छा नसते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. संवाद कौशल्यासाठी आपली भाषा समृध्द होणं गरजेचं असतं, व्याकरणाचं सखोल ज्ञान आपल्याला असायला हवं, वाचनाची आवड असावी. आपले हावभाव, देहबोली, नजर यातून जे व्यक्त होतं तेच शब्दातूनही समोर यायला हवं.
प्रत्येक व्यक्ती सतत स्वत:शी संवाद साधत असते. सुमारे सत्तर ते बहात्तर हजार विचार चोवीस तासांत प्रत्येकाच्या मनांत येत असतात. त्या-त्या प्रसंगानुसार, परिस्थितीनुसार आपल्या मनात विचार येत असतात. आपण आपल्या विवेकी बुद्धीच्या जोरावर त्या-त्या प्रसंगाचं मूल्यमापन करीत असतो, त्या अनुषंगानं आपण संबंधित निर्णय घेत असतो. यामध्ये आपण स्वतःशीच संवाद साधत असतो, स्वतःलाच प्रश्न विचारतो, त्याची स्वतःच उत्तरं देतो. दोन व्यक्तींमधील संवादात सहसा तिसरी व्यक्ती सामील झालेली नसते. हा संवाद व्यक्तिगत, थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो, ज्यात शब्द, देहबोली यांचा अंतर्भाव असतो. या संवादामुळे व्यक्तीचं मन वळवणे, एखाद्यावर प्रभाव निर्माण करणे शक्य होतं. या संवादामध्ये मौखिक आणि अमौखिक संवाद शक्य असतो. त्याचबरोबर अशा संवादात तात्काळ प्रतिसादही मिळत जातो.
जेव्हा दोन पेक्षा अधिक व्यक्तींचा समूह तयार होतो, तेव्हा समूहाच्या आवश्यकतेनुसार कमी अथवा अधिक संख्या ठरत असते. समूह संवादाचे रूप म्हणजे जनसंवाद. यामध्ये संप्रेषक आणि श्रोता यांचा थेट संवाद प्रस्थापित न होता तो एखाद्या जनसंवाद माध्यमाद्वारे प्रस्थापित होतो. हा थेट संवाद नसल्यामुळे संप्रेषक आणि श्रोता एकमेकांना ओळखत नाहीत, त्यामुळे संवादाचा म्हणावा तसा प्रभाव श्रोत्यांवर पडत नाही आणि श्रोत्यांची प्रतिक्रिया देखील संप्रेषकाकडे उशिरा पोह्चते.काहीवेळा मूक संवादाचं आश्चर्य वाटतं.अर्थात,मूक असेल तर तो संवाद कसा आणि संवाद असेल तर अव्यक्त कसा ? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आले. अनेकदा आपलं व्यक्तं होणं आपल्या गप्प राहण्यांतून देखील काही विशिष्ट प्रकारे सूचित करू शकतं.
काहीवेळा आपल्या आपापसातील संवादाची सुरुवातच विसंवादानं होत असल्याचं दिसून येतं. संवादाचा अभाव हे माणसांमाणसांत दुरावा निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण असतं. अलीकडच्या काळांत विभक्त कुटुंब, कौटुंबिक कलह आणि निर्माण झालेले क्लेश, द्वेष ह्यामुळे बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, पती-पत्नी, पिता-पुत्र, सासू-सून यांच्यात संवाद असतोच असं नाही. रक्ताच्या नात्यांत देखील संवादाआभावी अनेक गैरसमज, समस्या निर्माण झाल्याचं दिसून येतं. आपली सुख-दु:ख, भाव-भावना, विचार-आचार, ह्या बाबींची देवाणघेवाण करायला वावच नसतो, असं नाही. परंतू संवादाच्या माध्यमातून सुखाच्या यशोशिखरांवर पोहोचण्यासाठी आपापसातील संवादालाच बगल दिली जाते.