सकारात्मकतेने व्यक्त होण्यातूनच व्यक्तिमत्व विकास
आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणानं मनांतील विषय एखाद्याला सांगितले कि मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचं देखील जाणवतं. ह्या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचं निराकरण होत जातं. काहीवेळा उद्भवलेल्या प्रश्नांची उकल होत जाते. मनातील भय, न्यूनगंड दूर होण्याच्या दृष्टीनं मोकळेपणानं आपल्या मनांतील शंका व्यक्त करणं उपयुक्त ठरतं. आपल्याला पडलेले प्रश्न केवळ आपल्याच भ्रम आणि संभ्रमामुळे निर्माण होत असतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं सारखी नसतात, प्रत्येकाचे प्रश्न निराळे असतात, उत्तरेही प्रत्येकासाठी भिन्न असतात. जसं व्यक्ती तितक्या प्रकृती तसंच, जसे प्रश्न तशी त्यांच्यासाठी उत्तरे, हे लक्षात घेणं जरुरीचं असतं. एखाद्या समस्येचं उत्तर सर्वांनाच लागू होतं असं नाही, हेही समजून घेणं आवश्यक असतं.
व्यक्त होणारीच व्यक्ती असते; अशाच व्यक्तीचं व्यक्तिमत्व चार चौघांपेक्षा निराळं असतं. जन्माला आलेला प्रत्येक जीव, काहीना काही प्रकारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करतच असतो. ते व्यक्त होणं आवाजाच्या माध्यमातून, लिखित स्वरूपांत, देहबोलीच्या वापरांतून होत असतं. आपल्या अंतर्मनांत येणारे विचार, विषय, घटना, अनुभव आपण अगदी जवळच्या, आपल्या हक्काच्या व्यक्तीजवळ बोलून दाखवत असतो. म्हणजेच एकप्रकारे आपण व्यक्तच होत असतो. तसं करण्यामुळे आपल्या मनांत साठून राहिलेल्या विचार बाहेर पडतात, त्यांना मोकळी वाट करून दिली जाते. निसर्ग नियमानुसार ते गरजेचं असतं.
- व्यक्ती तितक्या प्रकृती
प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी, विशेष असते. प्रत्येकाच्यात एक वेगळी खासियत असते; जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणाच ठरवतो कि आपण कोण आहोत, कसे आहोत, एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो? गरज असते ती आपली अंतर्गत क्षमता जागवण्याची आणि व्यक्तिमत्व सुधारण्याची. व्यक्तिमत्व विकासामुळे आळस, अनुत्साह आणि निरसतेमध्ये अडकलेली व्यक्ती कार्यक्षम, उत्साही, प्रसन्न आणि आपल्या ध्येयानं प्रेरित होऊ लागते. व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती आपल्या वैशिष्ट्यांना कोणत्याही प्रतिकाराशिवाय, आपल्या सीमांच्या बंधनांचा त्याग करणे शिकत असते. आनंदी राहणे शिकत असताना सर्व काही अधिक उत्साहानं, चैतन्यानं करू लागत असल्याचं दिसून येतं. व्यक्तित्व म्हणजे वेगळं, निराळं अस्तित्व असलेली व्यक्ती. प्रत्येकास जन्मतः स्वतःचं असं व्यक्तित्व असतंच. या व्यक्तित्वावर सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडल्यावर व्यक्तित्वाचं व्यक्तिमत्वात रुपांतर होत असतं.
एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती जशी आहे तशी, म्हणजे व्यक्तीची शारीरिक ठेवण, बुद्धी, चारित्र्य, कर्तृत्व, गुण आदींचा समावेश त्यात होतो. व्यक्तीचा शारीरिक, भावनिक आणि सामाजिक विकास होत असतो. ह्या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तीचा हा घडलेला पिंड म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असतं. व्यक्तिमत्व म्हणजे बाह्य दर्शन असा अर्थ घेतला जात असतो. व्यक्तिमत्वाचा हा अर्थ एकांगी असल्याचं म्हंटलं तर निश्चितच वावगं ठरणार नाही. ह्यामध्ये व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा, बुद्धीचा, भावनांचा, गुणांचा आणि वृत्तीचा अंतर्भाव होत नसल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे ही व्याख्या परिपूर्ण होऊ शकत नाही. व्यक्तिमत्वात व्यक्तीची शरीरयष्टी, चेहरेपट्टी, ठेवण, बांधा, त्याची बुध्दिकौशल्ये, क्षमता, अभिरुची, आवडनिवड, संपादित गुण इत्यादी बाबींचा प्राधान्यक्रमानुसार साकल्यानं विचार केला पाहिजे. ह्या सर्वांची व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तिजीवन जगण्यापर्यंत झालेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व, असं म्हणल्यास ते व्यक्तिमत्वाच्या व्याख्येच्या दृष्टीकोनातून योग्य ठरू शकतं.
- व्यक्त होण्यासाठी जरा हटके विचार
आपल्याला दैनंदिन जीवनात निरनिराळे अनुभव येत असतात. ज्यामुळे आपली मानसिकता बदलत राहते. या बदलत जाणाऱ्या मानसिकतेच्या अनुशंगाने जरा हटके विचार करण्याची जरुरी असते. नंतरच कार्यकृती करणे योग्य ठरत असते. आपल्या अंतर्मनांत जीवनासाठी अभ्यासपूर्वक विचार होणे आवश्यक असते. ह्यात सकारात्मक आणि विवेकी विचारांना अधिक महत्व असते. आपल्या जीवनाच्या समृद्धीसाठी आयुष्याची सुरुवातच घरामध्ये सकारात्मक विचारांनी करायची असते. कारण ह्या सर्वच बाबींचा संबंध आपल्या व्यक्त होण्यासाठी असतो. मनाला रमवण्यासाठी आणि नवं आजमावण्यासाठी आपल्या अंतर्मनाचा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यासपूर्वक विचार करावा लागतो. आपल्या मनाला नीट समजून घ्यावं लागतं. आपल्याच मनाचा अनेकदा आपल्याला अंदाज येत नाही.
- गुण समुच्चय महत्वाचे
प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात; त्यातील काही गुण इतरांसारखे देखील असतात, तर काही गुण इतरांपेक्षा वेगळे, निराळे असतात. खरं तर ह्या वेगळ्या गुणांमुळेच ती व्यक्ती ओळखता येते. म्हणूनच, व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीमधील वैविध्यपूर्ण गुणविशेषांचा वैशिष्ट्यपूर्णसंच होय. व्यक्तिमत्व विकास हि एक व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये, शारीरिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, आत्मिक विकास अशा अनेक बाबींचा समावेश असल्याचं दिसून येत असतं. सध्याच्या २१ व्या शतकात व्यावसायिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी फक्त उच्च शिक्षण असून चालत नाही; त्यासोबत आपल्यातील आत्मविश्वास सुद्धा महत्वाचा ठरत असतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा किती प्रभाव पडतो, ह्यावर आपल्या कामाचा आलेख ठरविला जात असतो. आपण कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रात काम करत असताना आपल्या वक्तृत्वाचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. आपण आपले विचार, विषय किती तार्किक पद्धतीने, अगदी सोप्या भाषेत, सोयीस्कररित्या, न अडखळता, धीटपणाने आणि समोरच्या व्यक्तीला पटतील असे मांडू शकल्यास आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव निश्चितच समोरच्या व्यक्तीवर पडतो. समोरची व्यक्ती बोलत असताना तेवढ्याच शांततेनं, त्या व्यक्तीला ऐकून घेण्याची क्षमता सुद्धा आपल्यात असल्यास, आपल्या व्यक्तित्वाला एक आकार, एक वेगळं महत्व मिळू शकतं.
- व्यक्त होण्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकते
मानसिक स्वास्थ्य हे आपल्या भावनात्मक, मानसिक आणि सामाजिक बाबींशी निगडीत असतं. आपण कसा विचार करतो, अनुभवतो आणि कृती करतो ? यावर ते अवलंबून असतं. अनेकदा नकळत आपल्या अंतर्मनावर ताण येत असतो, तो जाणवत नाही आणि म्हणूनच कळतही नाही. अशावेळी आपल्या क्रिया आणि प्रतिक्रिया अनावधानानं बदलत जातात. त्यामुळे घेतलेले निर्णय आणि त्या दरम्यान इतरांशी होणारे आपले संवाद काहीवेळा विपरीत परिणाम करणारे ठरू शकतात. यासाठीच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी बालपणापासून वृद्धार्पणापर्यंत मानसिक स्वास्थ्य महत्वाचं असतं. आपल्या जीवनात आपण मानसिक स्वास्थ्यविषयक समस्यांचा सामना करत असलो, तर आपली विचारसरणी, अंतर्मनाची भावना आणि वागणूक ह्या सर्वांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्यासाठी समस्या निर्माण करणारे नकारात्मक विचार जरी ते सामान्य आहेत असं वाटत असलं तरीही सकारात्मक विचारांच्या माध्यमातून आपण निश्चितच परिवर्तन घडवून आणू शकतो. आपल्या व्यक्त होण्यातून आपलं व्यक्तिमत्वाचं वेगळेपण त्यांतच सामावलेलं असतं.
आपल्या मनांत येत असलेल्या प्रत्येक विचाराचा परिणाम कमी अधिक प्रमाणांत आपल्या मानसिकतेवर होत असतो. नकारात्मक विचारांचा विपरीत परिणाम होत असतो, तर सकारात्मक विचार यशप्राप्तीसाठी उपयुक्त ठरतात. आपल्या प्रत्येक कृतीपूर्वी विचार होण्याची जरुरी असते. अनेकदा अविचारानं अथवा विचाराशिवाय कृती केल्यानं पश्चातापाची वेळ येते. ती केवळ तापदायकच नव्हे तर घातकही ठरू शकते. मनांत येणारा प्रत्येक विचार आपल्या वर्तन आणि व्यवहाराला कारणीभूत ठरत असतो. आपल्या आयुष्यांत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्या अंतर्मनावर कोरल्या गेलेल्या विचारांशी असतो. एखाद्या व्यक्तीचे यश देखील आपल्या मनांत नकारात्मक विचार निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते. अलीकडच्या काळांत अल्पवयीन मुले-मुली नैराश्याचे शिकार होताना दिसत आहेत. आपल्या व्यक्त होण्यातून सकारात्मक वातावरणाची निर्मिती करणं जरुरीचं असतं. सकारात्मक विचारमंथन हे नेहमीच उर्जा देणारे ठरत असते. त्याचा थेट परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असल्याची अनुभूती येत असते. त्यासाठी आपलं व्यक्तिमत्व सतत सकारात्मक रीतीने व्यक्त होत राहणे आवश्यक असते.