“गुरूंच्या संकीर्तनाशिवाय या जगात दुसरे काहीच शाश्वत नाही” ! – पू. सौ. मनीषा पाठक
“गुरूंच्या संकीर्तनाशिवाय या जगात दुसरे काहीच शाश्वत नाही. गुरूंची स्तुती, गुरूंची कीर्ती, गुरूंची महती आणि गुरूंचे कीर्तनच मनुष्याला तारून नेते. गुरु स्थूलदेहाने जरी वेगळे असले तरी गुरुतत्त्वाने सर्व जोडलेले असतात”, असे सनातनच्या संस्थेच्या१२३ व्या (समष्टी) संत, पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी मार्गदर्शनात सांगितले. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी लिहिलेल्या “आध्यात्मिक जीवन एक अंतर्मुख प्रवास” तसेच “गुरुकृपा आणि आत्मबोध” या दोन अध्यात्मिक ग्रंथ लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
हा सोहळा शब्दातून अनुभवण्यापेक्षा अंतरंगातून अनुभवण्याचा आहे. हा ग्रंथलोकारपणाचा कार्यक्रम असूनही कार्यक्रमांमध्ये सर्वजण एकरूप आहेत. सर्व श्रद्धावंत जीव येथे उपस्थित आहेत. येथे कोणताही दिखाऊपणा नसून सहजता आणि आनंद जाणवत आहे. सभागृहामध्ये प्रवेश केल्यावर गुरुभक्तीचा दैवी सुगंध आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
सर्वांच्या साधनेतील अडथळे दूर व्हावेत अध्यात्मिक जीवांची प्रगती व्हावी अशी पू. सौ. मनीषा पाठक यांनी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना केली.
या सोहळ्याला गायिका चारुशीला बेलसरे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर, सनातन संस्थेच्या संत पू. सौ. मनीषा पाठक आणि परमपूज्य मुंगळे महाराजांचा (सद्गुरुंचा) बालपणीचा सहवास लाभलेल्या डॉ. सुमती देशपांडे मंचावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांना भेटवस्तू, शाल, आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
गायिका चारुशीला बेलसरे यांना गुळवणी महाराजांनी शक्तिपात दीक्षा दिली, तर हृदयनाथ मंगेशकर यांनी ‘बाल लता’ ही उपाधी दिली आहे. गुरु, आई, वडील आणि परमेश्वर यांना वंदन केले पाहिजे. ज्यांच्याकडून आपण शिकतो त्यांचे स्मरण सतत ठेवायला हवे. भक्तीयोग आणि नामयोग याचा वटवृक्ष प्रत्येकाच्या मनी उभा राहून त्याचा आत्मज्ञानाचा वृक्ष व्हायला हवा. मनुष्याने अहम बाळगू नये. मन, चित्त हे सतत सद्गुरूंच्या चरणी ठेवावे तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते, असे चारुशीला बेलसरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले.
मी वारीचा ‘अभ्यासक’ नसून ‘उपासक’ आहे ! – डॉ. अरविंद नेरकर
संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर यांनी ‘पंढरपूर वारी आणि मराठी साहित्य’ यावर संशोधन केले गोड बोलण्याने आपले नुकसान न होता लाभच होतो प्रपंचातून परमार्थ साधावा. मात्र परमार्थ हा चर्चेचा विषय नसून अनुभूतीचा विषय आहे, ही संतांची शिकवण सर्वांनी ध्यानात घ्यायला हवी. मी अनेक वर्ष वारी केली, पण मी वारीचा अभ्यासक नाही तर उपासक आहे असे मत डॉक्टर अरविंद नेरकर यांनी व्यक्त केले.
डॉ. सुमतीताई देशपांडे यांनी सद्गुरु परमपूज्य मुंगळे महाराज यांच्या सहवासातील बालपणीच्या आठवणी कथन केल्या. कार्यक्रमाला संत, साधक, मित्रपरिवार, शिक्षक आप्तेष्ट हितचिंतक आदी १०० हून अधिक जण उपस्थित होते. विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे सद्गुरू प. पू. मुंगळे महाराज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ग्रंथ प्रकाशनाचा अनौपचारिक कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता.
(लेखक) विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी सद्गुरूंबद्दल लिहिलेले गौरवोद्गार त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून केलेल्या लेखनाचे वाचन सनातन संस्थेच्या सौ. प्रीती कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
अतिशय भावपूर्ण आणि आनंददायी वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
श्री. शैलेश अनंत कुलकर्णी (लेखक) यांना त्यांचे सद्गुरु प.पू. मुंगळे महाराज यांनी ‘विद्यावाचस्पती विद्यानंद’ ही उपाधी बहाल केली. सनातन वैदिक संस्कृती आणि तिचे वैभव टिकवण्याचे निरंतर कार्य सनातन संस्था करत आहे. समाजातील विकृतींना नष्ट करून क्रियाशीलतेसाठी मिळणारी प्रेरणा टिकवून ठेवण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे असे सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी व्यक्त केले. सनातन संस्थेच्या संत पू. सौ. मनीषा पाठक यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी संमती दिली याप्रती त्यांनी संतांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी सद्गुरु परमपूज्य मुंगळे महाराज यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून लिहिलेल्या लेखनाचे सार:
१. प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे प. पू. मुंगळे महाराजांचे जीवन होय.
२. नामाचे, ध्यानाचे सद्गुरूंच्या कृपेचे आणि ईश्वरी इच्छेचे महत्त्व आणि महात्म्य सांगून सद्गुरूंनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनातील क्षण विलक्षण केले.
३. संपूर्ण ब्रम्हांडात चैतन्य निर्माण करणारे शब्द, लालित्य म्हणजे सद्गुरूंची प्रवचनेच होय.
४. नामाची गोडी आणि भगवंताची जोडी जेव्हा प्राप्त होते तेव्हाच मनुष्य जगण्यापलीकडील जीवनाची अनुभूती प्राप्त करू शकतो.
५. काळ वेळ परिस्थिती कशाचेच बंधन नामाला नाही.
६. प्रत्येक साधकाने साधना ही नियमित कर्तव्य समजून नित्य नियमाने, अंतर्मुख होऊन, आत्मभान जागृत ठेवून, आत्मिक आनंदासाठी केली पाहिजे. आणि त्यासाठी सर्वप्रथम आत्मनिष्ठ होणे जरुरीचे असते. त्यामुळे आपल्यात नवचैतन्य, नवीन उमेद, नवा उत्साह आणि नवा जोश निर्माण होतो. त्यामुळे मनुष्याचा आत्मविश्वास वाढीस लागण्याची सुरुवात होते.
७. जीवनात घडलेली, घडणारी आणि घडत असलेली प्रत्येक गोष्ट ही ईश्वरचरणी होते.
८. देहबुद्धी मुळापासून जाळून टाकल्याने मनुष्याच्या आचारात, विचारात, उच्चारात, वर्तनात आणि व्यवहारात ‘मी’ अथवा ‘माझेपण’ दिसत नाही.
लेखक परिचय
१. विद्यावाचस्पती विद्यानंद यांना सद्गुरु मुंगळे महाराज गुरु म्हणून लाभले. सन २००० पासून त्यांची साधना चालू आहे. मागील पाच वर्षापासून सायंकाळी ६.३० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० पर्यंत १७ तास ते मौन साधना करतात.
लेखक विद्यवाचस्पती विद्यानंद यांनीच कार्यक्रमाचे निवेदन केले.
व्यावहारीक जीवनात त्यांनी वेगवेगळ्या विषयांच्या ३८ हून अधिक पदव्या प्राप्त केल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातही ते मोठ्या पदावर कार्यरत होते.
२. दर्शन पुस्तिका खंड एक मध्ये विद्यावाचस्पती विद्यानंदांचे गुरु परमपूज्य मुंगळे महाराज यांचे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, यांच्या समवेत असलेल्या छायाचित्राचा संदर्भ देऊन सनातन संस्था आणि दोन्ही गुरूंच्या चरणी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
