गुंतवणूक भावनांची आनंद कोट्यावधींचा
आजच्या गतिमान, आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात अन्न, वस्त्र आणि निवारा या किमान प्राथमिक गरजांचा विचार करून फक्त चालत नाही, तर बदलत चाललेल्या जीवनमुल्यांचाही स्विकार करावा लागतो. आज आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुखात आणि दुःखात आपल्याला शारीरिकदृष्ट्या साथ-सोबत करणारं, मानसिक आधार देणारं, अंतर्मनाला धीर देणारं, आर्थिकदृष्ट्या सक्षमता देऊ करणारं, सामजिक पत निर्माण करणारं, शैक्षणिक प्रगतीची दिशा दाखवणारं, कौटुंबिक एकोपा टिकवणारं, आपली नातीगोती जपणारं, उणीवा दूर करणारं, आपल्या जाणीवा जपणारं, आपल्या जाणीवांना नेणीवेपर्यंत घेवून जाणारं, आपल्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारं आपलं हक्काचं साधन हे दुसरं-तिसरं कोणतंही नसून ते म्हणजे आपण पै पै जमवलेलं धन अर्थात आपला स्वतःचा पैसा. आपल्या सर्वांच्या जीवनात अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपली धन दौलत. या धन दौलतीचा थेट संबंध आपल्या भाव भावनांशी असतो.
“आपलं धन” या शब्दांमधुनच आपल्या स्वतःच्या पैशाविषयीच्या भाव भावना प्रकट होत असतात. आपल्याला आपल्या स्वतःच्या धनाची असलेली ऊब आणि त्यामुळेच निर्माण झालेलं आपल्या पैशाबरोबरचे नातं अतूट असतं. आपण शरीरानं आपल्या घरापासून दूर असतो तेव्हा देखील आपल्या मनात आपलं धन आणि आपलं घर हे घर करून राहीलेलं असतं. हि घरघर प्रेत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याप्रमाणे अनुभवली जात असते. आपलं मन आणि धन एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या असतात. आपल्या मनातलं धन आणि धनाढ्य मन तसेच मनातलं घर आणि घरातलं मन या दोन्हींचा मेळ आपण घालू शकलो पाहिजेत. पै पै जमवलेली जमापुंजी आपल्या स्वतःसाठी अथवा घरासाठी वापरताना आणि मुख्य म्हणजे ती मिळवताना तसेच जमवताना अनुभवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहात नाही. आपलं प्रत्येक स्वप्न साकार होताना आपल्याला मिळणारा आनंद निश्चितच निराळा असतो. पण हि स्वप्न साकारण्यासाठी आपल्या पैशाची यथायोग्य बचत करणंही तितकेच जरुरीचं असतं.
सद्य:स्थितीत अनेकवेळा साधेपणा म्हणजे भोळेपणा किंवा गबाळेपणा समजला जातो. अत्याधुनिकीकरण आणि काही प्रमाणात अंधानुकरण यामुळे एकूणच आपल्या राहणीमानात बरेच बदल होत असतात. हे होणारे बदल एका अर्थी आपला विकासच घडवत असतात. आपले केवळ नीटनेटके राहणे हे पुरेसे नसून आपण चारचौघांमध्ये वेगळे आणि आकर्षक दिसणे आवश्यक झालं आहे. मुळातच सुंदर असणं आणि आकर्षक दिसणं या दोन्ही गोष्टी जरी सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या असल्या तरीही केवळ सुंदर असणं सुद्धा पुरेसे नसून आकर्षक दिसणं आणि त्यासाठी नीटनेटके राहणं आवश्यकच असतं. यामुळेच सुंदर असण्यापेक्षाही सुंदर दिसण्यासाठी काहीजणांचा कल असतो. या अशा सुंदर आणि आकर्षक राहणीमानासाठी निश्चितच आर्थिकदृष्ट्या काही तरतूद करणं अनिवार्य असतं. या राहणीमानाची नुसती सवय होऊन चालत नाही तर असे राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी थोडाफार खर्चही करावा लागणं स्वाभाविक असतं.
एकूणच आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि प्रत्येक अनुभव सुखद असण्यासाठी आवश्यकता असते ती आपल्या पैशाच्या योग्य वापराची, बचतीची आणि गुंतवणुकीची. प्रत्येकाच्या जशा गरजा वेगवेगळ्या असतात तसेच उत्पन्न अथवा आपल्या हाती येणारा पैसा देखील कमी-अधिक प्रमाणात आपल्या पदरी पडत असतो. खरं कसब आपल्या हाती असणाऱ्या पैशाचा योग्य वापर आणि बचत आपण कशाप्रकारे करतो त्यातच असतं. असा अनेकदा गैरसमज असतो कि जो अर्थार्जन करतो तोच ते उत्तम प्रकारे करू शकतो. “जोडोनी धन उत्तम व्यवहारे, संसार करावा नेटका” हे कोणीही आत्मसात करू शकतं. आयुष्यात करण्यासारखे खूप काही असतं पण फक्त आपलं तिकडे लक्षच नसतं. केवळ सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात अर्थक्रांती घडवून आणण्याचं काम आपण स्वतः करू शकतो.
आपल्या हातात “अर्थ” आहे तर आणि तरच आपलं जीवन समर्थ आहे आणि आयुष्याला अर्थ आहे, अशी सद्य:स्थिती असल्याचं आपण प्रत्येकजण अनुभवत आहोत. अर्थात पैसा कमवणे आणि जमवणे हे तो गमावण्यापेक्षा अधिक कष्टप्रद असतं. आपण मिळवलेला पैसा कमवायला आणि जमवायला जो वेळ लागतो त्याच्या तुलनेनं गमवायला काहीच वेळ लागत नाही. गमवलेला पैसा परत मिळवता येऊ शकेलही परंतु तो कमवण्यासाठी गमवलेला वेळ मात्र परत मिळवता येत नाही याचं भान आपण सर्वप्रथम ठेवणं आवश्यक असतं. अनेकदा आपण करायला गेलो एक आणि झालं भलतेच, असा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. आणि अशावेळी केवळ आपला पैसाच केवळ आपल्या उपयोगी पडतो याची जाणीव आपल्याला होणं हेदेखील तितकेच महत्वाचं असतं.
आपल्यापैकी नोकरी व्यवसाय करणाऱ्या तसेच न करणाऱ्या प्रत्येकानं आर्थिक व्यवहाराच्या महत्त्वपूर्ण बाबी समजूत घेतल्या पाहिजेत. हाती असलेल्या पैशाचा केवळ गरजेपुरता उपयोग करून बचतीचे तंत्र अवगत केलं पाहिजे. यासाठी आपण प्रत्येकवेळा अगदी प्रत्येक बाबतीत काटकसरच केली पाहिजे असं काही नाही. पण पैसे खर्च करण्यापूर्वीच आपल्या गरजांची योग्यता, त्यांची आपण करत असलेली अपेक्षा आणि त्यांची पूर्तता या सर्वच बाबींचा आपण अभ्यासपूर्वक विचार केला पाहिजे. या गरजा नक्की झाल्या कि माघार घेऊन पैसे वाचवण्याची आवश्यकता नाही. आपल्या गरजांची पूर्तता झाल्यावर शिल्लक राहणाऱ्या पैशाची बचत करण्याकडे अनेकांचा कल असतो. अर्थात ते स्वाभाविकच असतं. परंतु या व्यतिरिक्त निराळं तंत्र आपण आत्मसात करून केलेली बचत अधिक चांगल्याप्रकारे होऊ शकते.
“पैसा हे साधन आहे, निश्चितच ते साध्य असू नये” हे जरी सत्य असलं तरीही ते साधन साध्य करण्यासाठी विविध साधनं कशाप्रकारे वापरावीत हे समजून घेणंही सद्य:स्थितीत तितकेच आवश्यक आहे. काहीवेळा असं म्हंटले जातं कि पैशानीच पैसा मिळवला जातो. आणि एका दृष्टिकोनातून ते अगदी खरंही आहे. आपल्या बचतीची नवनवीन तंत्र वापरून त्याची प्रचीती आपल्याला येऊ शकते. आपल्या पैशाच्या बचतीसाठी विविध पर्यायांची आपण अभ्यासपूर्वक माहिती घेणं आपल्याच पैशाच्या वृद्धीसाठी उपयुक्त ठरू शकतं.
बचत आणि गुंतवणुकीचे विविध पर्याय:
- घरगुती बचत
- पोस्टातील बचत आणि गुंतवणूक
- बँकेतील बचत आणि गुंतवणूक
- खाजगी कंपन्यांच्या ठेवींमधील गुंतवणूक
- शेअर्स आणि डिबेंचर्सच्या माध्यमातील गुंतवणूक
- सरकारी अथवा सरकारमान्य रोख्यांमधील गुंतवणूक
- म्युच्युअल फंडातील गुंतवणूक
- विमा कंपनीमधील गुंतवणूक
- सोने आणि चांदी खरेदीतील गुंतवणूक
- जमीन खरेदीतील गुंतवणूक
- घर अथवा व्यावसायिक वास्तूंच्या खरेदीतील गुंतवणूक
- व्यावसायिक गुंतवणूक
एकूणच बचत आणि गुंतवणूक हा विषय गहन आहे परंतु समजून उमजून हाताळला तर आपल्या पैशाची वृद्धी आणि आनंद द्विगुणीत करण्याची संधी आपल्याच नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील उपलब्ध होऊ शकते आणि फायदेशीर ठरू शकते. प्रत्येक महिन्यासाठी बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या नवनवीन पर्यायांविषयीची तथ्य आणि पथ्य आपण या माध्यमातून समजून घेणार आहोत.
घरगुती बचत: आपल्या घराशी असलेलं आपलं नातं आणि आपल्या नात्यातल्या सर्वांचं त्या घरात राहणं यांचा परस्परांशी असणारा संबंधच केवळ आपल्या घराला घरपण प्राप्त करून देत असतो. आपण आपल्या कुटुंबीयांचं आपल्याशी असलेलं नातं जसं जपण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आपल्या घराशी असलेलं नातंही आपण जपत असतो. आपल्या कुटुंबापासून जसं मनानं आपण फार काळ दूर राहू शकत नाही तसंच काहीसं आपल्या घराच्या बाबतीतही आपलं होतं. या नात्यात प्रेमाचा ओलावा असल्यामुळेच आपल्या घरातल्या वातावरणात आपण गोडवा अनुभवत असतो. हे गहिरे नाते-संबंध खरं तर आपल्या प्रत्येक यशस्वी वाटचालीस कारणीभूत असतात. आणि केवळ याच कारणामुळे आपण आपल्या कुटुंबाची तसेच आपल्या घराची विशेष काळजी घेत असतो. आपलं नातं अधिक धृढ करण्याचा आपला नेहमी प्रयत्न असतो. याच दृष्टिकोनातून आणि आपल्या घरापासून आपण बचतीचे नवनवीन पर्याय निवडू शकतो.
घरगुती बचत हा विषय सर्व परिचित आणि तरीही अनेकदा दुर्लक्षित राहणारा असल्याचं दिसून येतं. घरगुती बचत करणं खरं तर अगदी कोणालाही सहज शक्य होऊ शकतं. त्यासाठी काटकसर करणं हा काही समाधानकारक पर्याय होत नाही. आपल्या दैनंदिन गरजा यथायोग्य भागवून देखील ठराविक रक्कम आपण बचतीसाठी शिल्लक ठेवू शकतो अथवा ती बाजूला काढून ठेऊ शकतो. यासाठी सहज शक्य होणारी काही पथ्य आपण पाळू शकतो:
- आपल्या हाती असलेली रक्कम एकाच ठिकाणी न ठेवता थोडी-थोडी करून वेगवेगळी ठेवल्यास खर्चासाठी नेमके किती पैसे आपल्याकडे आहेत याचा हिशेब आपण करत बसत नाहीत किंवा करण्यासाठी तेवढा वेळ देऊ शकत नाही. अशावेळी हाती लागणाऱ्या एकाच ठिकाणच्या पैशाचा वापर आपल्याकडून होतो आणि इतरत्र ठेवलेली रक्कम शिल्लक राहते. सद्य:स्थितीत अनुभवायला येणाऱ्या घरफोड्या अथवा भुरट्या चोऱ्या यापासून देखील आपलं मोठ्ठे नुकसान टळू शकतं. कारण आपण एकाच ठिकाणी एक रकमी पैसे ठेवणं टाळणार आहोत.
- स्वतःजवळ असलेल्या पैशातून नेहेमी केवळ मोठ्या नोटा खर्चासाठी वापराव्यात. आणि लहान नोटा बाजूला ठेवून द्याव्यात. जसे दहा रुपयांच्या आपल्याजवळ येणाऱ्या नोटा शक्यतो खर्च न करता राखून ठेवाव्यात आणि गरजेप्रमाणे नेहेमी पन्नास, शंभर, पाचशे अथवा एक हजारच्याच नोटा वापराव्यात. असं करण्यामुळे आपसूकच प्रत्येक दहाची नोट राखून ठेवली जाते आणि एकप्रकारे बचतच होते.
- मोठ्या नोटा जवळ बाळगत असताना अनेकदा कमी किंमतीच्या वस्तू घेण्यासाठी आपण विचार करत असतो तेव्हा मोठी नोट म्हणजे पाचशे अथवा एक हजारची नोट मोडण्याची आपली इच्छा होत नाही. आणि काहीवेळा अनावश्यक खर्च कि जो आपल्या हातून होण्याची शक्यता असते तो न होता आपली काही प्रमाणात बचतच होते.
- आपल्याला भेट अथवा बक्षीस स्वरुपात मिळालेल्या पैशावर आपला हक्कच नाही असं गृहीत धरून मिळलेल्या पैशाची पूर्णच बचत होऊ शकते. या स्वरूपातून मिळणारे पैसे अनेकदा आपल्याला अनपेक्षितपणे मिळालेले असतात. मग जर ते मिळालेच नाहीत असं समजलं तर काय बिघडतंय?
- दैनंदिन खर्चात मोठ्या रक्कमेच्या खर्चासाठी आपल्याला सतत पैसे लागत नाहीत मात्र छोट्या रक्कमेच्या वस्तूंची खरेदी मात्र वरचेवर आपल्याकडून सारखीच होत असते. आणि यातच आपल्याजवळील पैसे किती आणि कसे संपले याचा ताळमेळच काहीवेळा जमत नाही. त्यामुळे एकवेळ मोठ्या खर्चासाठी फार मागेपुढे पाहण्याची गरज नाही परंतु छोट्या खर्चांवर मात्र काटेकोरपणे लक्ष ठेवणं तसेच असे खर्च आपल्या मर्यादेत आणि नियंत्रणात ठेवणं केवळ आवश्यकच ठरतं असं नाही तर बचतीच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतं.
- आपल्या घरातल्या लहान मुलांना एक, दोन, पाच रुपयांची नाणी त्यांच्या घरेलू बँकेत ठेवण्यासाठी द्या. आपल्यापेक्षा हि लहान मुलेच बचतीचे काम नेटानं करतात. थेंबे-थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एक एक रुपयांच्या बचतीतून त्यांच्याच भावी आयुष्यासाठी लाखो रुपयांची बचत होऊ शकते.
- अनेक प्रकारच्या बिलांची रक्कम आगाऊ भरल्यास अथवा इंटरनेटद्वारे भरल्यास मिळणारी सूट एकप्रकारे काही प्रमाणात आपली बचतच करत असते. प्रत्येक महिन्याची हि एकूण रक्कम अगदी शंभर रुपये असली तरीही वर्षभराची याद्वारे होणाऱ्या आपल्या बचतीची रक्कम एक हजार दोनशेहून अधिक असणार आहे.
आपल्या पैशाच्या गुंतवणुकीला भावनांची जोड असते. आपल्या भाव-भावना, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण, चांगले-वाईट अनुभव या सर्वच गोष्टींचा संबंध आपल्या पैशाच्या गुंतवणुकीशी असतो. त्यामुळे आपण करत असलेली “गुंतवणूक भावनांची असते आणि आनंद कोट्यावधींचा असायला लागतो”. या आनंदाची अनुभूती अनुभवण्यासाठी निश्चितच काही विशेष खबरदारी घ्यावी लागते. काहीवेळा आपल्या गुंतवणुकीचा विषय भावनेचा असल्यामुळे आपण निर्णय देखील भावनेच्या आहारी जाऊन घेतो. आणि तो भावूकतेत घेतलेला निर्णय आपल्या भवितव्यावरच घाला घालतो. आपलं भवितव्य उज्वल होण्याच्या ऐवजी उध्वस्त होण्याची शक्यता निर्माण होते. हल्ली अनेक प्रकारची प्रलोभने दाखवून आणि फसव्या जाहिराती करून तसेच मोठ्ठ्या परताव्याची आमिषे दाखवून इंटरनेट, मोबाईल, सोशल नेटवर्किंग या विविध माध्यमांच्या वापरातून अनेकांच्या फसवणुकीच्या घटना घडत असल्याचं आपण नेहेमीच ऐकत आहोत. या अशा प्रकारच्या फसवणुकीचा फटका आपल्याला बसणार नाही यासाठी आपण सदैव सतर्क राहणं आवश्यक आहे. आपल्या पैशाची गुंतवणूक करताना अविचारांना दिला थारा कि समजा तुमच्या लाखाचे झाले बारा. आपली सजगता, सतर्कता, समय सूचकता आणि सावधानता याच गोष्टी आपल्या सुखी, समृद्धी आणि सदा-सुखी जीवनासाठी महत्वाच्या ठरणार आहेत. त्यासाठीच “गुंतवणूक भावनांची असली तरीही आनंद कोट्यावधींचा असायला हवा”.